महाड : महाड नगरपरिषद निवडणुक मतदान प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात झालेल्या राड्यानंतर दोन्हीकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये याआधीच काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असताना गुरुवारी आणखी एका संशयित आरोपीस महाड शहर पोलिसांनी अटक केल्याची माहिती महाड शहर पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत पोलिसांनी दोनही गटातील सहाजणांना ताब्यात घेतले आहे.
विजय रामचंद्र घरटकर (वय 46), राहणार टोळ बु, ता. महाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून 7 जानेवारीच्या रात्री लोणेरे फाटा येथील नंदिनी एंटरप्राइजेस परिसरातून गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहकार्याने महाड शहर पोलिसांनी घरटकर याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय घरटकर हा महाडमध्ये घडलेल्या गुन्ह्याप्रसंगी घटनास्थळी उपस्थित असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुशांत जाबरे याच्यासोबत विजय घरटकर उपस्थित असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चौकशीदरम्यान आरोपीने देखील याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घरटकर यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या मारहाणीच्या घटनेत दोन्ही गटाकडून झालेल्या परस्परविरोधी गुन्ह्यात उच्च न्यायालयाने सर्व आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारल्याने यातील प्रमुख आरोपी आदींवर अटकेची टांगती तलवार कायम असून यातील पुढील घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास महाड शहर पोलिसांमार्फत सुरू आहे.