Mahad Poladpur military tradition Pudhari
रायगड

Mahad Poladpur military tradition: महाड-पोलादपूरतालुक्याला सैनिकी परंपरेचा वारसा!

सैनिकी परंपरेचा गौरवशाली इतिहास जतन करावा-सेवानिवृत्त सैनिकांची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

महाड : श्रीकृष्ण बाळ

महाड व पोलादपूर तालुके केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे, तर सैनिकी परंपरेच्या दृष्टीनेही राज्यात वेगळे स्थान राखून आहेत. शिवकाळापासून या परिसरातील ग्रामीण तसेच घरपट्टी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर सैन्यात दाखल झाल्याचा इतिहास उपलब्ध आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या भागातील तरुणांनी मोलाची भूमिका बजावल्याचे दाखले आढळतात. हीच परंपरा पुढे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सैन्यात आणि स्वतंत्र भारताच्या सैन्यातही निष्ठेने पुढे नेण्यात आली आहे.

या दोन तालुक्याच्या मुख्य ठिकाणी म्हणजेच महाड व पोलादपूर शहरात तालुक्यांतील विविध महायुद्धातून कामगिरी केलेल्या व सहभागी झालेल्या स्वर्गीय तसेच सध्या हयात असलेल्या सैनिकांच्या संदर्भातील परिपूर्ण माहिती या विशेष घालण्यातून देण्याची आवश्यकता असल्याचे मत सेवानिवृत्ती सैनिकांकडून व्यक्त होत आहे.

इतिहासापासून असलेला हा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी शासनानेच आता पुढाकार घेणे आवश्यक असून सामान्य नागरिकांनी आपली कर्तव्यपूर्ती केल्यानंतर त्यांच्या ऋणात राहण्यासाठी शासन किमान एवढे तरी करणार का असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून या देशसेवेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्यांसाठी विचारला जात आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये महाडपोलादपूर तालुक्यातील शेकडो नागरिकांनी देशासाठी प्राणांची आहुती दिल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून फौजी अंबावडे, बाकी यांसह विविध गावांमध्ये स्मृतिस्तंभ उभारण्यात आले आहेत. हे स्मृतिस्तंभ आजही या भागाच्या सैनिकी वारशाची साक्ष देत असून, नव्या पिढीला देशसेवेची प्रेरणा देत आहेत.स्वातंत्र्यानंतरही महाड पोलादपूरची ही परंपरा खंडित झालेली नाही. आजही तालुक्यातील अनेक गावांमधून तरुणाई मोठ्या उत्साहाने सैन्यात भरती होण्यासाठी पुढे येत आहे. प्रतिकूल परिस्थिती, कठोर प्रशिक्षण आणि शिस्तबद्ध जीवन याची जाणीव असूनही देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेण्याची मानसिकता या भागात आजही मजबूत आहे. त्यामुळेच महाड -पोलादपूर हा भाग ‌‘सैनिक घडवणारी भूमी‌’ म्हणून ओळखला जातो.

सेवानिवृत्त सैनिकांना पेन्शन, वैद्यकीय, शासकीय कागदपत्रे, माजी सैनिक कार्यालयीन कामकाज तसेच विविध कार्यक्रमांसाठी महाड किंवा पोलादपूर येथे यावे लागते. अशा वेळी त्यांच्यासाठी सुसज्ज विश्रांतीगृह उपलब्ध नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. माजी सैनिकांचे मेळावे, शौर्यदिन, विजयदिन, स्मृतिदिन, मार्गदर्शन शिबिरे, युवकांसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांसाठी स्वतंत्र सभागृहाची नितांत गरज आहे. सध्या अशा कार्यक्रमांसाठी योग्य व सुसज्ज जागेचा अभाव जाणवतो. परिणामी, अनेक उपक्रम इच्छेअभावी नव्हे तर सुविधांच्या अभावामुळे मर्यादित राहतात.महाड- पोलादपूर तालुक्यात सेवानिवृत्त सैनिकांसाठी स्वतंत्र सभागृह व विश्रांतीगृह उभारल्यास ते केवळ सुविधा केंद्र न राहता, देशभक्ती, शौर्य आणि प्रेरणेचे केंद्र बनेल. याकडे शासन, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी व्यक्त होत आहे.

मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची खंत

महाड व पोलादपूरातील ग्रामीण भागात या सेवानिवृत्त सैनिकांना पुढील वारसदारांना सीमा रेषेवर ड्युटीवर असताना संपर्क साधण्यासाठी अनेक यातायात करावी लागते. यासंदर्भात फौजी अंबवडे परिसरातील सेवानिवृत्त सैनिकांनी यापूर्वीच आमदार व खासदारांकडे या परिसरात विशेष नेटवर्क उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे. मात्र दुर्दैवाने याकडे आजपर्यंत अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याचे दिसून आले.मात्र, इतका गौरवशाली इतिहास आणि योगदान असूनही सेवानिवृत्त सैनिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT