

पोयनाड : विजय चवरकर
रायगड जिल्ह्याची राजधानी अलिबाग हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळे रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. शनिवार- रविवार रस्ता वाहनांनी भरून वाहत असतो, वाहतूककोंडी नित्याचीच समस्या झाली आहे. त्यात भर पडली आहे रस्त्यावरील खड्ड्यांची.
जीवघेणे खड्डे चुकाविताना दुचाकी, चार चाकी वाहन चालकांना कसरत करावी लागते. त्यातून छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्त्यावरील काही खड्डे असे आहेत, त्यात दुचाकीचे चाक गेले तर मृत्यू दूर नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आतापर्यंत तालुक्याला अनेक आमदार मिळाले. आमदार आले आणि गेले परंतु रस्त्याचा विषय गांभीर्याने कोणीच घेतला नाही. अलिबाग तालुक्यातील जनता म्हणते रस्त्याचे रुंदीकरण राहिले दूर. प्रथम आहे तो रस्ता चांगला करावा.
अलिबाग-वडखळ रस्त्यावरील प्रवास नको असेच जनतेकडून ऐकावयास मिळते. अलिबाग मुरुड मतदार संघातून प्रामुख्याने शेका पक्षाच्या चित्रलेखा पाटील, सेनेचे आ. महेंद्र दळवी आणि अपक्ष दिलीप भोईर यांच्यात लढत झाली. यातून दळवी विजयी झाले. चित्रलेखा पाटील, भोईर पराभूत झाले. यावेळी भोईर हे आमदार महेंद्र दळवी यांचे बरोबर हातमिळवणी करून शिवसेनेत दाखल झाले, मग विरोधक म्हणून उरल्या शेका पक्षाच्या चित्रलेखा पाटील त्यामुळे जनतेमध्ये चर्चा आहे.
विरोधात असलेल्या शेका पक्षाला अलिबाग-वडखळ रस्त्याच्या दुरावस्थेसाठी आंदोलन करण्याची संधी आहे पण ते रस्त्या संदर्भात रस्त्यावर का उतरत नाहीत. रस्त्या संदर्भात सत्ताधारी कमी पडले, विरोधक गप्प बसले तर जनतेला वाली कोण असाही प्रश्न उभा राहतो.
अलिबाग तालुक्याचे 50 टक्के अर्थकारण पर्यटनावर अवलंबून आहे. खराब रस्त्यामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाला तर आर्थिक घडी विस्कटेल. अलिबाग तालुक्यासाठी राजकीय पक्षांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींनी काय दिले? आता वेळ आली आहे सत्ताधार्यांनी अलिबाग रस्त्याच्या नूतनीकरणासाठी सरकार दरबारी प्रयत्न करावे व विरोधकांनी चांगल्या रस्त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा अशी मागणी नागरिकांची आहे.
गणेशोत्सवाअगोदर रस्त्यातील खड्डे भरले गेले परंतु खड्डे भरण्याची मलमपट्टी तात्पुरती ठरली. रस्त्यातील खड्डे पुन्हा जिवंत झाले आहेत. जगातील तिसरी महासत्ता बनू पाहणार्या आपल्या देशात जनतेला चांगले रस्ते मिळत नाहीत. खड्ड्यामुळे मृत्यूच्या घटना घडत आहेत. रस्त्यातील भ्रष्टाचार थांबत नाही तो कधी थांबणार असा प्रश्न यांना जनता विचारत आहे. स्थानिक नेत्यांनी हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी होत आहे.