Forest fire Mahad Pudhari
रायगड

Forest fire Mahad: महाड खाडीपट्ट्यात जानेवारीतच वणव्यांचे तांडव; डोंगररांगा काळवंडल्या

वनसंपदा व वन्यजीवांचे मोठे नुकसान, मुद्दाम वणवे लावल्याचा नागरिकांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत

उन्हाळ्याची चाहूल लागताच साधारण फेब्रुवारी महिना सुरू झाला की, महाड खाडीपट्टयातील डोंगरांना वनवे लागण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मात्र यावेळी फेब्रुवारी महिना सुरु होण्यापूर्वीच जानेवारीमध्येच वणव्यांनी उग्ररुप घेतले आहे. दररोज लावण्यात येणाऱ्या वणव्यांमध्ये खाडीपट्टयातील वनसंपदा व वन्यप्राण्यांचे देखील मोठे नुकसान होत आहे. काही ठिकाणी अज्ञानातून तर काही ठिकाणी मुद्दाम वणवे लावले जात असल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते. वणवे रोखण्यासाठी वनविभागाने वेळीच कडक पावले उचलणे गरजेचे असल्याचे काही सुज्ञ नागरिकांनी सांगितले.

महाड खाडीपट्टयातील डोंगरांवर वणव्यांचे प्रमाण जास्त आहे. येथील लागलेल्या वणव्यामुळे सारे डोंगर उघडे बोडके झाले आहेत. त्यामुळे येथील डोंगररांगा काळवंडलेल्या पाहायला मिळत आहेत. या भागात जाणून-बुजून वणवे लावले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात आहेत.

वारंवार लागणाऱ्या या वणव्यांमुळे अमूल्य वनसंपदा त्याचबरोबर औषधी वनस्पतींची देखील अतोनात नुकसान होत आहे. मोठे वृक्ष ही वणव्यांमुळे होरपळून जात आहेत, त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच्या डोंगररांगा देखील वणव्यामुळे जळून खाक होत आहेत.

सामाजिक संस्थांकडून वारंवार होत असलेल्या वृक्ष लागवडीचे वणव्यामुळे नुकसान होत आहे. वृक्ष लागवड अभियानातील चांगली वाढलेली झाडे वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. वणव्यांमुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येत आहे. अनेक छोटे-मोठे वन्यजीव आगीच्या तावडीत सापडून होरपळले जात असल्याने जीवसृष्टीच्या चक्रातून गंभीर परिणाम होत आहेत. तर त्यामुळे कित्येक वन्यजीव गावाकडे धाव घेत असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. लागणाऱ्या वणव्याच्या आगीमूळे वाऱ्यासोबत जळलेली काळी गवताची राख अंगणासह घरी उडून येत आहे. तर दूपारच्या रखरखत्या उन्हामध्ये वणव्याच्या आगीमूळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना गरमीच्या कडक ज्वालांशी सामना करावा लागत आहे.

सातत्याने लागणाऱ्या या वणव्यांवर वन विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी गावागावांतून जनजागृती करायला हवी. वेगवेगळ्या समित्या गठन करून त्या माध्यमातून वणवे रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, तरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारी वनसंपदा वाचण्यास मदत होईल. अन्यथा, पर्यावरणाचे नुकसान असेच होत राहील असे सुज्ञ नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT