माणगाव : कोकण किनारपट्टीच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी आणि जनजागृतीसाठी केंद्र शासनाच्या ‘सुरक्षित तट समृद्ध भारत’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत आयोजित वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन 2026 चे शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे उत्साहात आगमन झाले. देशभक्तीच्या घोषणांनी आणि उत्स्फूर्त स्वागताने विद्यापीठ परिसर दुमदुमून गेला.
सकाळी ठीक 9 वाजता ध्वजप्रदर्शन (फ्लॅग ऑफ) समारंभात सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही रॅली लोणेरे येथून महाड सोवेली (दापोली) दाभोळ गुहागर असा प्रवास करणार असून कोकण किनारपट्टीवर सुरक्षा जनजागृतीचा संदेश देणार आहे. समारंभाला रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, विद्यापीठ अधिष्ठाता एस. एल. नलबलवार, माणगाव प्रांताधिकारी संदीपान सानप, तहसीलदार विपिन लोकरे, माणगाव डीवायएसपी श्रीमती गर्जे, एनसीसी अधिकारी मेजर डॉ. मिलिंद भगत, कुलगुरू के. व्ही. काळे, कुलसचिव अमित शेष तसेच विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते सायक्लोथॉनला प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, युवक-विद्यार्थी, महिला बचत गट तसेच मच्छीमार संघटनांचा सक्रिय सहभाग आहे. ‘वंदे मातरम’ आणि ‘सुरक्षित तट समृद्ध भारत’ या घोषणांमधून किनारपट्टी सुरक्षेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. कार्यक्रमादरम्यान नागरिकांना किनारपट्टीवरील सतर्कतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. संशयास्पद हालचालींची त्वरित माहिती देणे, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधणे, तसेच सागरी सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ड्रोन पाळत, सीसीटीव्ही यंत्रणा आणि तातडीची प्रतिसाद प्रणाली अधिक सक्षम करण्यात आल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. या मोहिमेमुळे कोकणात राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होण्यासोबतच सुरक्षा विषयक जनजागृतीला चालना मिळणार आहे. किनारपट्टी सुरक्षित असल्यास पर्यटन, उद्योग आणि मत्स्य व्यवसायालाही नवे बळ मिळेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.
या मोहिमेमुळे कोकणातील सुरक्षा अधिक मजबूत होण्यासोबतच पर्यटन, उद्योग आणि स्थानिक रोजगाराच्या संधींना चालना मिळेल. नागरिकांनीही सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे.किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड