Valentine Day Cake Trend 2026: प्रेमदिनासाठी केकची क्रेझ; बेंटो आणि गुप्त संदेश केकला तरुणाईची पहिली पसंती
पाली : शरद निकुंभ
प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रेमदिनानिमित्त बाजारपेठेत विविध भेटवस्तूंची चहलपहल असली, तरी यंदा प्रेम व्यक्त करण्यासाठी केकला सर्वाधिक मागणी असल्याचे चित्र दिसत आहे. फुले, चॉकलेट, शुभेच्छा पत्रे यांपेक्षा केकला प्राधान्य दिले जात असून, विशेषतः तरुणाई आणि प्रेमी युगुलांमध्ये बेंटो केक, हृदयाकृती केक आणि गुप्त संदेश असलेले केक लोकप्रिय ठरत आहेत.
यंदा केक हा केवळ गोड पदार्थ न राहता, भावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम बनला आहे. केवळ दोन जणांसाठी पुरेसा, आकाराने लहान पण दिसायला आकर्षक असा बेंटो केक तरुणांचा आवडता पर्याय ठरत आहे. साधी पण सुंदर सजावट, हलके वजन आणि केकवर छोटासा भावनिक मजकूर लिहिण्याची सोय यामुळे मोठ्या समारंभांपेक्षा खासगी, आपुलकीच्या साजऱ्या कार्यक्रमांकडे तरुणाईचा कल वाढला आहे.
यासोबतच गुप्त संदेश केक ही संकल्पना विशेष आकर्षण ठरत आहे. वरून साधा दिसणारा हा केक कापल्यानंतर किंवा आतला भाग उघडल्यानंतर त्यामधील लपवलेला प्रेमभाव व्यक्त करणारा संदेश समोर येतो. अशा केकमधून आपुलकी, जिव्हाळा आणि नात्यातील विश्वास व्यक्त केला जात असून, जोडीदाराला वेगळ्या पद्धतीने आनंद देण्यासाठी तरुणाई हे केक आवर्जून निवडत आहे.
पाली परिसरातील केकची दुकाने आणि घरगुती पातळीवर केक बनवणारे व्यावसायिक सध्या या वाढलेल्या मागणीमुळे व्यस्त झाले आहेत. शुद्ध साहित्य, अंडीविरहित केक, कमी साखरेचे पर्याय तसेच ग्राहकांच्या पसंतीनुसार रंग, चव आणि सजावट मिळत असल्याने अनेक ग्राहक घरगुती केक निर्मात्यांकडे वळताना दिसत आहेत. चॉकलेट, लाल रंगाचा मऊ केक, फळांच्या चवीचे केक यांना विशेष मागणी आहे.
प्रेमदिनाबरोबरच संपूर्ण प्रेमसप्ताहात विविध दिवसांनुसार वेगवेगळ्या प्रकारचे केक खरेदी केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केकची दुकाने खास सजावटीने नटली असून, ग्राहकांसाठी विविध सवलतीही दिल्या जात आहेत. परिणामी, या काळात केक विक्रेत्यांचा व्यवसाय चांगलाच फुलला आहे.
भेटवस्तूंचा बदलता कल
पूर्वी प्रेमदिनाला शुभेच्छा पत्रे, चॉकलेट किंवा टेडी दिले जात होते. मात्र आता त्या जागी वैयक्तिक स्वरूपाचे केक आले आहेत. हे केक वजनाने हलके, दिसायला आकर्षक आणि छोट्या साजऱ्या कार्यक्रमांसाठी योग्य असल्याने तरुणाईला विशेष भावत आहेत. गुलाब, चॉकलेटच्या सजावटीसह हृदयाकृती केकना आजही मोठी मागणी असून, प्रेम व्यक्त करण्याचा हा गोड कल दिवसेंदिवस अधिक बळावत आहे.
‘प्रेमदिनानिमित्त हृदयाकृती आणि लाल रंगाच्या केकला कायमच पसंती असते. मात्र यंदा बेंटो केकसाठी मोठ्या प्रमाणावर आगाऊ नोंदणी झाली आहे. अनेक ऑर्डरी आधीच नोंदवण्यात आल्या असून, ऐनवेळी येणाऱ्या ग्राहकांची संख्याही लक्षणीय आहे. गुप्त संदेश असलेल्या केकची मागणी अधिक असून, जोडीदाराला सरप्राइज देण्यासाठी हे केक विशेष पसंतीस उतरले आहेत.”
निवेदिता भावे, संचालिका, डॉटेल

