JNPA Shipping Pudhari
रायगड

JNPA Shipping: जेएनपीएची नवी झेप! मध्यपूर्वेसोबत सागरी संपर्क बळकट करणाऱ्या सेवेला सुरुवात

पीएसए मुंबई टर्मिनलवरून ‘जेजेएस’ सेवेचा शुभारंभ; व्यापार आणि निर्यात-आयात क्षेत्राला मोठी चालना

पुढारी वृत्तसेवा

उरण : राजकुमार भगत

भारतातील आघाडीचे आणि सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. जेएनपीएच्या पीएसए मुंबई या कंटेनर टर्मिनलवर ग्लोबल फीडर शिपिंगच्या जेजेएस सेवेचा यशस्वी शुभारंभ करण्यात आला आहे. 24 मार्च 2026 रोजी एमव्ही एसएसएफ डायनॅमिक या जहाजाच्या पहिल्या आगमनाने या सेवेची अधिकृत सुरुवात झाली.

या नवीन सागरी सेवेमुळे भारत आणि मध्यपूर्वेतील प्रमुख बंदरांमधील व्यापारी संपर्क अधिक बळकट होणार आहे. या सेवेअंतर्गत जहाजांचा मार्गः मुंद्रा न्हावा शेवा जेद्दाह किंग अब्दुल्ला सोखना अकाबा किंग अब्दुल्ला जेद्दाह मुंद्रा. असा असेल.

मध्यपूर्वेतील सध्याच्या बदलत्या आणि आव्हानात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, ही नवीन सेवा व्यापार प्रवाहांना अधिक स्थैर्य आणि विश्वासार्हता देणारी ठरेल. भारतीय आयातदार आणि निर्यातदारांना या सेवेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सातत्यपूर्ण प्रवेश मिळेल, ज्यामुळे देशाची पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

याच महिन्यात पीएसए मुंबई टर्मिनलने आणखी एक मोठी कामगिरी बजावली होती. जर्मन ध्वज असलेले दमिएटा एक्सप्रेस हे अल्ट्रा लार्ज कंटेनर व्हेसल नुकतेच या बंदरावर दाखल झाले होते. या जहाजाची क्षमता: सुमारे 23,664 टीईयू एवढी प्रचंड आहे. याचा आकार अंदाजे 400 मीटर लांबी आणि 61 मीटर रुंदी आहे. जेएन पोर्टच्या इतिहासात कोणत्याही टर्मिनलवर लागलेले हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे जहाज ठरले आहे. जेएनपीए प्रशासनाने आपल्या जागतिक दर्जाच्या टर्मिनल ऑपरेटर्सच्या कार्यक्षमतेचे आणि मेहनतीचे विशेष कौतुक केले आहे. त्यांच्याच उत्तम नियोजनामुळे जेएनपीए बंदर सातत्याने नवनवीन जागतिक विक्रम प्रस्थापित करत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT