

महाड : महाडवरून पुण्याला जोडणाऱ्या म्हाप्रळ-पंढरपूर या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या रुंदीकरणामुळे वरंधा आणि भोर घाटात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असून, त्यामुळे वनसंपदेचे मोठे नुकसान होत आहे. या बाबीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे. परिणामी, हा मार्ग ओसाड होत चालल्याचे दृश्य या महामार्गावरून प्रवास करताना दिसून येत आहे.
रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे रुंदीकरण सुरू असून, भोर हद्दीत रुंदीकरणात अडथळा ठरणारे वृक्ष आणि झुडपे जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात येत आहेत. राजेवाडी ते वरंधा-भोर- महाड या पट्ट्यात पूर्वी दाट जंगल होते; मात्र रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी जुनी आणि महाकाय वृक्ष तोडण्यात आली आहेत.
महाड-भोर-वरंधा या महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या बदल्यात पर्यायी वृक्षलागवड करणे आवश्यक होते. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे स्पष्ट धोरण काय आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच संबंधित ठेकेदाराकडूनही याविषयी कोणतीही स्पष्टता नसल्याने या महामार्गाचे पूर्वीचे नैसर्गिक वैभव कमी झाल्याचे दिसून येत आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांना विचारले असता, मागील वर्षी वृक्षलागवड करण्यात आली होती आणि यावर्षीही पावसाळ्यात तशीच वृक्षलागवड केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता, मागील वर्षी केलेल्या वृक्षलागवडीचे ठोस पुरावे आढळून येत नाहीत. किती वृक्ष लावले गेले आणि त्यापैकी किती टिकून आहेत, याबाबतही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.
वरंधा आणि भोर घाट परिसरात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून, येथे आयुर्वेदीक वनस्पती आणि जैवविविधतेचा समृद्ध साठा आहे. मात्र या वृक्षतोडीमुळे ही जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक पर्यावरणीय दृष्टीने महत्त्व असलेल्या या घाटाकडेही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे.
वृक्षतोडीनंतर पर्यायी वृक्षलागवडीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून, महाड-वरंधा-भोर मार्गाच्या रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली असली तरी पुनर्लागवडीसंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार यांचे ठोस धोरण नसल्याचे स्पष्ट होत आहे.