

कणकवली परिसरात सापडला मृतदेह
गुरुवारी मध्यरात्री घडला गुन्हा
अमर कदम हा ओरोस-डोंगरेवाडी येथे राहणारा
मृतदेह तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात
गोळी बंदुकीची की रिव्हॉल्व्हरची?
कणकवली : कणकवलीतील बांधकाम व्यवसायिक आणि शासकीय ठेकेदार सुशांत जनार्दन दळवी (40, मूळ गाव कळसुली-गवसेवाडी) यांचा मृतदेह गोळी झाडून खून केलेल्या स्थितीत कणकवली मुडेश्वर मैदानाकडच्या पाण्याच्या टाकीनजिक मोहनमळा येथे शुक्रवारी सकाळी 7 वा. च्या सुमारास आढळून आला.
प्रथमदर्शनी हा खूनच असल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी पोलिसांनी तपासाची सुत्रे वेगाने हलवत सुशांत दळवी यांचा मुकादम अमर सत्यवान कदम (19, रा. ओरोस-डोंगरेवाडी) याला सायंकाळी अटक केली. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून आणखी दोन संशयित चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. सुशांत आणि अमर हे शिकारीसाठी गेले असतानाची ही घटना असल्याचे सांगितले जात असून सुशांत याचा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
कणकवलीतील ठेकेदार जावेद शेख यांचे विजापूरमधील काही कामगार मोहनमळा येथे त्यांच्या मालकीच्या शेतमांगरात राहतात. शुक्रवारी सकाळी 7 वा. च्या पूर्वी त्यांचा कामगार सिद्धू लमाणी हा प्रातःविधीसाठी गेला असताना त्याला कपाळावर जखम झालेल्या स्थितीत एक माणूस पडलेला दिसून आला. त्याने जावेद शेख यांना कळवल्यानंतर शेख यांनी कणकवली पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर तो मृतदेह सुशांत दळवी यांचा असल्याचे दिसून आले. जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोमी साटम, डीवायएसपी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस आणि एलसीबी पोलिसांनी तपास सुरू करत त्याठिकाणी धागेदोरे हाती लागण्यासाठी सुत्रे हलवली.