Raigad Rain : Heavy rains in Roha, Kundlika river crossed warning level
रोह्यात मुसळधार पाऊस, कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली Pudhari Photo
रायगड

Raigad Rain : रोह्यात मुसळधार पाऊस, कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली

पुढारी वृत्तसेवा

रोहे : महादेव सरसंबे

रायगड जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात (शुक्रवार) रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला आहे. सकाळीही तालुक्यात पावसाचा जोर चांगलाच होता. त्यामुळे डोंगर माथ्यावरून येणारे नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. दुपारी रोहा अष्टमी पुलाला पाणी लागले होते. रोहा अष्टमीला जोडणारा जुना पुल वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. त्‍यामुळे नव्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. रोहा नागोठणे मार्गावरील अष्टमी येथे रस्त्यावर रात्री काही ठिकाणी पाणी आले होते. (Raigad Rain)

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्हयातील नदी नाले भरुन वाहु लागले आहेत. जिल्हयातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास, गाढीनदी भरुन वाहत आहेत. जिल्ह्यात दमदार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. (Raigad Rain)

रायगड जिल्ह्यातील धरणक्षेत्रात सरासरी ८९.२४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. रायगड जिल्ह्यातील २८ धरणापैकी २१ धरणे १०० टक्के भरली आहेत. यातील २० धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. उर्वरीत धरणापैकी ४ धरणे १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. तर ३ धरणात अद्याप ५० टक्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. श्रीवर्धन तालुक्यातील रानीवाली धरणात सर्वात कमी पाणीसाठा म्‍हणजे ३३ टक्के एवढे आहे. (Raigad Rain)

गेली चार-पाच दिवस रोहा शहरासह रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणात चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात काही शेत जमिनीमध्ये पाणी साचले आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्‍कळीत बनले आहे.(Raigad Rain)

SCROLL FOR NEXT