प... पर्यावरणाचा
नूतन बांदेकर
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्रात 17 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही भागांत 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अधिक जाणवू शकतो. गेले तीन चार दिवस पश्चिम किनारपट्टी म्हणजेच कोकण पट्ट्यातील पालघर, ठाणे, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आपण उष्णतेच्या लाटेला सामोरे जात आहोतच. आता मार्च महिन्याच्या मध्यावर ही अवस्था आहे तर एप्रिल, मे मध्ये काय परिस्थिती असेल? मुंबईसह कोकणाचं नागपूर आणि नागपूरसह विदर्भाचं जैसलमेर होऊ घातलंय, हे दुसरं तिसरं काही नसून ग्लोबल वॉर्मिंगचे चटके बसणं आहे, हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची गरज नाही. विचार फक्त एवढाच करायचा आहे की, हे जर ट्रेलर असेल तर पुढचा सिनेमा कसा असेल? ऑक्सिजन सिलिंडर पाठीवर घेऊन फिरण्या-शिवाय पर्याय उरणार नाही. ज्याच्याजवळ ऑक्सिजन हब तो देश श्रीमंत, महासत्ता!!
अगदी लवकरच हे सगळं सत्यात उतरणार आहे, असं मी म्हणत नाहीये, तर आंतरराष्ट्रीय हवामान खात्याने वर्तवलेलं हे भविष्य आहे आणि त्याची सुरुवात झालेली आपण अनुभवत आहोत. हे असं होण्याच्या अनेक कारणांपैकी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बेसुमार जंगलतोड!
हवेतला कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेणारी वृक्षराजी मोठ्या प्रमाणावर तोडल्यामुळे कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे वातावरणातील उष्णतामान वाढते, हे सर्वज्ञात असूनही ‘वृक्षतोड करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.’ असे म्हणत माणूस निसर्गाला आव्हान देत आहे. वाढती लोकसंख्या, अन्नधान्य निर्मितीकरिता शेतीचा विस्तार, वाढते औद्योगिकरण, वाढते शहरीकरणासाठी लागणाऱ्या लाकडाच्या मागणीमुळे निर्माण होणारी एक गंभीर समस्या आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
खनिजे मिळविणे, घरे व वेगवेगळ्या वास्तू बांधणे, कागद तसेच फर्निचर बनविणे या प्रमुख कारणांमुळे तसेच वणवे आणि अनियोजित विकासामुळे अनिर्बंध वृक्षतोड होत आहे, त्यामुळे जगभरातील जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत व आज ग्लोबल वॉर्मिंगचा राक्षस आपल्यासमोर आ वासून उभा राहिला आहे.
वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यासाठी शेतीयोग्य जमीन वाढवण्यासाठी जंगले तोडली जातात. हे जंगलतोडीचे सर्वात मोठे कारण आहे. जगभरातील सुमारे 80% जंगलतोड ही कृषी उत्पादनामुळे होते. आशिया खंडात, सागवानाच्या विपुल साठ्यासाठी ओळखला जाणाऱ्या म्यानमारमध्ये वनांचा ऱ्हास सर्वाधिक दिसून आला आहे. 2015 पासून 29 लाख इतक्या निव्वळ वनहानीसह, ब्राझीलचा जागतिक स्तरावर पहिला क्रमांक लागतो. दरम्यान कंबोडियामध्ये वनांच्या ऱ्हासाचा वेग सर्वाधिक राहिला आहे. शहरीकरण आणि पायाभूत सुविधा शहरांची संख्या झपाट्याने वाढल्यानेे घरे, रस्ते, महामार्ग धरणे बांधण्यासाठी वनजमीन साफ केली जाते.
कागद, फर्निचर, आगपेट्या व इंधनासाठी लाकडाची मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. कागद निर्मितीसाठी बांबू तर लाकडी खेळणी बनविण्यासाठी हस्तिदंती पांगारा, सागवान, दुधी, रबरवुड, मॅपल, बिर्च, पाईन या वृक्षांचा उपयोग केला जातो. खाणकाम जमिनीखालील खनिजे काढण्यासाठी जंगलक्षेत्र नष्ट केले जाते. त्यामुळे खनिजसंपत्ती, वनसंपत्ती दोन्हींचा ऱ्हास होतो. पशुपालनासाठी कुरणे निर्माण करण्याकरीता जंगले जाळली किंवा तोडली जातात.
पशुपालन - पशुधन आणि पशुखाद्य हे जंगलतोडीचे एक महत्त्वाचे कारण आहे आणि ते थेट जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाच्या सुमारे 60% साठी जबाबदार आहे. वणवा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित वणव्यांमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जंगले नष्ट होतात. ज्यामुळे हवेचे प्रदूषण आणि जंगलांचा मोठा ऱ्हास होतो.
जंगलतोडीमुळे वन्यप्राण्यांचे अधिवास नष्ट होत आहे. यावर उपाय म्हणून आपण सध्या दरवर्षी वृक्षारोपण करत आहोत, ते वृक्षतोडीपेक्षा खूपच नगण्य आहे आणि ती जोपासून नवी जंगले निर्माण करणे तर अजिबात सोपे नाही. यामुळे हवामान बदल, जैवविविधतेचे नुकसान आणि मनुष्य जीवन ज्यावर अवलंबून आहे, अशा परिसंस्थेच्या जैवसाखळीत घट होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यास निसर्गाचा समतोल राखणे व निरोगी पर्यावरण निर्मितीस आपल्या देशात 33% भूभाग वनाखाली असावा असे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात.