रायगड

रायगड: पेब किल्ल्याच्या दरीतून ट्रेकर निखिल तनिरचा मृतदेह बाहेर काढला

अविनाश सुतार

कर्जत: पुढारी वृत्तसेवा: माथेरानच्या डोंगररांगेत असलेल्या विकटगड अर्थात पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या ग्रुपमधील एक १८ वर्षीय तरुण रविवारी (दि. १४) हरवला होता. त्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तरुणाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. माथेरान आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पथक आणि माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीमने संबंधित तरुणाचा मृतदेह १ हजार फूट दरीतून ४ दिवसानंतर बाहेर काढला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईमधील कांदिवली येथील १८ जणांचा ग्रुप पेब किल्ल्यावर रविवारी गड भ्रमंतीसाठी आला होता. निखिल तनिर हा तरुण वगळता अन्य सर्व ट्रेकर्स हे वयाने पन्नाशीच्या पुढील होते. हे सर्व ट्रेकर्स पेब किल्ला फिरून मुंबईकडे परत जात असताना आपल्यातील एक ट्रेकर्स आपल्यासोबत नाही हे लक्षात आले. त्यामुळे त्या ट्रेकर्सकडून पनवेल पोलीस ठाणे येथे निखिल तनिर हा तरुण पेब किल्ला येथे हरवला असल्याची तक्रार दिली होती.

त्यानंतर पनवेल पोलीस ठाणे आणि तेथील रेस्क्यू टीम यांच्याकडून दोन दिवस पेब किल्ल्याचे काही भाग पिंजून काढण्यात आला. परंतु निखिलचा शोध लागला नव्हता. बुधवारी (दि.१७) त्या तरुणाचे पालक पनवेल पोलीस ठाणे आणि नंतर नेरळ पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर नेरळ पोलीस आणि माथेरान पोलिसांनी पेब किल्ल्यावर तपास सुरु केला होता. सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, नेरळ पोलीस ठाण्याचे हवालदार निलेश वाणी, नागरगोजे, बारगजे, मोरे यांनी माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीमसोबत सर्च मोहीम सुरु केली. यावेळी एका सदस्याला सायंकाळी एक कापड दरीमधील कपारीत दिसून आले. त्यानंतर रात्री आठ वाजता किल्ल्यावरून एक हजार फूट दरीत निखिलचा मृतदेह आढळून आला. मृतदेह चार दिवस तेथे असल्याने सडलेल्या अवस्थेत होता. शेवटी चादरीमध्ये बांधून तो मृतदेह दरीमधून मुख्य गडावर मध्यरात्री दोन वाजता आणण्यात आला.

गुरुवारी (दि.१८) पहाटे ६ च्या दरम्यान नेरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या रेस्क्यू ऑपरेशनला माथेरान सह्याद्री रेस्क्यु टीमचे वैभव नाईक, सुनिल कोळी, दिनेश सुतार, सुनिल ढोले, चेतन कळंबे, संदीप कोळी, धीरज वालेंद्र, उमेश मोरे, मंगेश उघडे, राहुल चव्हाण, महेश काळे यांच्यासह अनेक तरुण या मोहिमेत सहभागी झाले होते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT