रायगड : महिला सन्मान योजनेमुळे महाड एसटी आगाराचे उत्पन्न दुप्पटीने वाढले

विन्हेरे ; पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर या सरकारने एसटीतून प्रवास करणार्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी महिला सन्मान योजना सुरु केली. या योजनांमुळे एसटीने प्रवास करणार्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. यातून एसटी बसच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत केला असून, महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सूट जाहीर केली आहे. यामुळे एसटी पासून दुरावलेल्या प्रवाशांनी पुन्हा एसटीने प्रवास करण्यास पसंती दिली आहे. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे प्रवास टाळणार्या जनतेने यावर्षी लग्नसराई, सुट्टी, गणपती, होळी अशा सणांसाठी गावी येण्यासाठी एसटीलाच पसंती दिली. यामुळे राज्यातील सर्व बय स्थानके प्रवाशांनी भरलेली पाहायला मिळत आहेत.
महाड एसटी आगारातही प्रवासी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. सर्व प्रवासी बसेस प्रवाशांनी खचाखच भरलेल्या पाहायला मिळत आहेत.
शासनाने महिला सन्मान योजना लागू केल्यानंतर महाड एसटी आगारातून १,३५२७८ महिलांनी प्रवास केला आहे. गतवर्षीचा एप्रिल महिन्याची तुलना केली असता, एप्रिल २०२२ मध्ये महाड आगाराचे उत्पन्न १ कोटी ८ लाख ४१ हजार ९९७ होते. यावर्षी हे उत्पन्न १ कोटी ८२ लाख १८ हजार २७४ रुपये इतके झाले आहे. गतवर्षी महाड आगारातील बसेस २ लाख ७३ हजार ७४१ किमी धावल्या. यावर्षी बसेस ५ लाख ४४ हजार ५७३ किमी धावल्या आहेत.
यावर्षी एप्रिल महिन्यात महिला सन्मान योजनेतून महाड आगाराला ४१ लाख ४८ हजार ६३२ रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा २५ हजार ९३५ प्रवाशांनी लाभ घेतला असून, १० लाख ६५ हजार ८०९ रुपये उत्पन्न मिळाले आहे.
हेही वाचा :