रायगड : दुबईच्या धर्तीवर अलिबाग येथे मत्सालय उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र भूमीपूजन होऊन वर्ष व्हायला आले तरी कामाला गती मिळू शकलेली नाही. तांत्रिक कारणांमुळे हे काम रखडल्याचे सांगितले जात आहे.
अलिबाग नगर परिषदेच्या विशेष अनुदान योजनेअतंर्गत अलिबाग समुद्र किनारी भव्य मत्स्यालयाची उभारणी केली जाणार आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या प्रकल्पाचा भूमिपूजन पार पडला होता. सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र वर्ष सरले तरी मत्स्यालयाचे पन्नास टक्के कामही होऊ शकलेले नाही.
या प्रकल्पासाठी राज्य शासनाने 60 कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले आहेत. विविध प्रकारचे सागरी मासे या मत्स्यालयात ठेवले जाणार आहेत. 40 फूट लांबीच्या मत्स्यालय टनेलचा यात समावेश असणार आहे. या शिवाय या मत्स्यालयात पर्यटकांना पाण्यात उतरून सागरी जीवसृष्टीचा अनुभव घेता येणार आहे. फूड कोर्ट आणि कॅफेटेरीयाचाही या समावेश असणार आहे. दुबईच्या धर्तीवर हे मत्स्यालय उभारण्यात येणार असून देशातील अशा पध्दतीचे हे पहीले मत्स्यालय असणार आहे.
या प्रकल्पामुळे अलिबागच्या पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सप्टेंबर 24 अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती ठेकेदारांकडून भूमिपूजनाच्या वेळी देण्यात आली होती. पण प्रत्यक्षात तसे झालेले नाही. महत्वाची बाब म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून मत्स्यालय उभारणीचे काम ठप्प असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे भूयारी गटार योजना, कान्होजी आंग्रे स्मारक सुशोभिकरण, श्रीबाग येथील क्रीडा संकुल पाठोपाठ अलिबागमधील आणखीन एक महत्वाकांक्षी प्रकल्प रखडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या मैदानात या मत्स्यालयाची उभारणी केली जाणार आहे. कंटेनर पध्दतीच्या या अभिनव मत्स्यालयात बोगद्याच्या आतून सागरी माशांचे विश्व अनुभवता येणार आहे. पण प्रशासकीय उदासिनता आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रकल्प शहरातील इतर प्रकल्पांप्रमाणेच रखडण्याची चिन्ह दिसत आहेत.
नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. मुख्याधिकारी यांना प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण कसे होईल यासाठी प्रयत्न करा असे निर्देश दिले आहेत.महेंद्र दळवी, आमदार
फप्रकल्पाचे काम सुरु आहे. कामगारांच्या समस्येमुळे काही दिवस काम बंद असू शकते. पण आता पुढील दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.सागर साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग नगरपालिका