

अलिबाग : रमेश कांबळे
गुन्ह्याची माहिती अथवा संकटात सापडलेल्या नागरिकांना आता 112 नंबरवर 24 तास तत्काळ मदत मिळत आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ व प्रभावी मदत मिळावी, या उद्देशाने कार्यान्वित करण्यात आलेली डायल-112 आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली रायगड जिल्ह्यात अत्यंत परिणामकारक ठरली आहे. रायगड पोलीस विभागात या प्रणालीचा सरासरी प्रतिसाद वेळ अवघ्या सहा मिनिटे 16 सेकंद इतका असून, राज्यातील उत्तम प्रतिसाद वेळांपैकी हा एक मानला जात आहे.
सन 2025 या वर्षात 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रायगड जिल्ह्यातील डायल-112 प्रणालीवर एकूण 20 हजार 617 आपत्कालीन कॉल्स प्राप्त झाले. या सर्व कॉल्सवर रायगड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नागरिकांना मदत पोहोचवली असून, अनेक प्रकरणांमध्ये पीडितांना न्याय मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे.
डायल-112 प्रणालीअंतर्गत अपघात, मारहाण, महिलांवरील अत्याचार, घरफोडी, दरोडे, कौटुंबिक वाद, आरोग्यविषयक आपत्कालीन घटना तसेच नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी मदतीसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात संपर्क साधण्यात आला. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये या प्रणालीमुळे पोलीस मदत पोहोचणे अधिक सुलभ झाले आहे.
या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे जीपीएस-आधारित ट्रॅकिंग, 24 बाय 7 कॉल सेंटर, तसेच घटनास्थळी जवळील पोलीस वाहन तात्काळ पाठवण्याची सुविधा. कॉल प्राप्त होताच संबंधित माहिती नियंत्रण कक्षातून थेट पोलीस पथकापर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे वेळेचा अपव्यय टळून घटनास्थळी जलद प्रतिसाद देणे शक्य होते.
रायगड पोलीस दलाने डायल-112 प्रणालीच्या माध्यमातून केवळ कायदा व सुव्यवस्था राखली नाही, तर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. अनेक गंभीर घटनांमध्ये पोलिसांच्या जलद प्रतिसादामुळे संभाव्य मोठे नुकसान टळले असून, आरोपींना तात्काळ अटक करण्यातही यश आले आहे. डायल-112 मुळे रायगड जिल्ह्यातील पोलीस सेवा अधिक गतिमान, विश्वासार्ह आणि नागरिकाभिमुख झाली असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. भविष्यातही ही प्रणाली अधिक सक्षम होणार आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता डायल-112 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. ही सेवा पूर्णपणे मोफत असून, प्रत्येक कॉलची दखल घेतली जाते. भविष्यातही ही प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मनुष्यबळ वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
आँचल दलाल, जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड