

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी किल्ले रायगड येथे अंधबांधवांना गिरीभ्रमणाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर यांच्या पुढाकारातून रविवार, 11 जानेवारी रोजी विशेष गिरीभ्रमणाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे सह-आयोजक म्हणून रोटरी क्लब ऑफ पेण ओरियन व रोटरी क्लब ऑफ महाड सहभागी झाले आहेत.
हा उपक्रम अंधजन विकास ट्रस्ट अंतर्गत कार्यरत अंधबांधवांसाठी राबविण्यात येत असून, अंध व्यक्तींनाही गड-किल्ल्यांच्या ऐतिहासिक वैभवाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा या पथदर्शी प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. रोटरी इंटरनॅशनल या संस्थेमार्फत गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असून, दरवर्षी महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांची निवड करून जवळपास 40 अंधबांधवांना ही ऐतिहासिक सफर घडविले जाते.
याच अनुषंगाने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमाचे नेतृत्व रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगरचे अध्यक्ष ऋषिकेश बागडे, रोटरी क्लब ऑफ पेण ओरियनचे अध्यक्ष पर्णल काणेकर व सचिव शेखर शिंदे, तसेच रोटरी क्लब ऑफ महाडचे अध्यक्ष सुधीर मांडवकर करीत आहेत. सेवा प्रकल्प संचालक म्हणून महेश घोरपडे, तर समन्वयक म्हणून पराग चांदे व सुबोध जोशी कार्यरत आहेत. इच्छुकांनी सहभागासाठी प्रसाद माने (मो. 9821812526) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.