Ajit Pawar Konkan Development Pudhari
रायगड

Ajit Pawar Konkan Development: कोकणच्या विकासाला दिशा देणारे अजितदादा पवार

निधी नियोजनापासून पायाभूत सुविधांपर्यंत—कोकणाच्या प्रगतीत अजितदादांचा ठसा

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप, रायगड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त आज सकाळी वाऱ्या सारखे सर्वत्र पोहोचले आणि कोकण किनारपट्टीतून हळहळ व्यक्त करण्यात आली. त्याचे कारणही तितकेच भावनीक आहे. महाराष्ट्र राज्यातील विकास गतिमान करायचा असेल तर विविध विकासाच्या संधी असलेल्या कोकणाची विकास करणे आवश्यक आहे अशा ठाम भूमीकेतून अजितदादा यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्येने कोकण विकासाला प्राधान्य दिले, आणि त्यांचे दृष्य परिणामा आता दिसून लागले होते. आणि अजितदादांनी अचानक एक्झीट घेतली त्याचा कोकणातील गावखेड्यापासून शहरातील प्रत्येक माणसांच्या मनाला दुखःचा तिव्र चटका लागला आहे.

कोकणासाठीचे अनन्यसाधारण निधी नियोजन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून प्रभावीपणे काम करित असताना अजितदादा यांनी कोकणच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. विशेषतः पायाभूत सुविधा, पर्यटन आणि नैसर्गिक आपत्तींमधून सावरण्यासाठी त्यांनी विशेष नियोजन करुन दिलेला निधी आणि त्यांतून पुन्हा उभे राहीलेले कोकण हे कोकणवासीय कधीही विसरू शकत नाहीत. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागीरी, सिंधूदूर्ग या जिल्ह्यांबरोबरचे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई करिता त्यांच्या दूरदृष्टीतून झालेले नियोजन आणि ता नियोजन तडीस नेण्यासाठीचे त्यांचे व्यक्तिगत योगदान, त्यासाठी तयार केलेल्या योजना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्या पूर्तेतेसाठीचे निधी नियोजन हे अनन्यसाधारण असेच आहे.

पायाभूत सुविधा आणि दळणवळण

कोकणाचा विकास हा प्रामुख्याने रस्ते आणि कनेक्टिव्हिटीवर अवलंबून आहे. त्याकरिता रस्त्यांचे जाळे सक्षण केले पाहीजे असी भूमिका स्वाकारुन अजितदादा यांनी आपल्या कारकिर्दीत सातत्याने आणि जाणीवपूर्व विशेष आर्थिक तरतूद केली आहे: रेवस ते रेडी सागरी महामार्ग हा त्यांतील एक महत्वाचा महामार्ग आहे. कोकणच्या किनारपट्टीला जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्यांनी भरीव निधी मंजूर केला आहे. यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. कोकण रेल्वे आणि रस्ते सुधारणा या अंतर्गत अजितदादांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी वेळोवेळी केंद्र सरकारशी समन्वय आणि राज्य शासनाकडून निधीचा पुरवठा करण्यात आग्रही भूमिका घेतली. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपूरावा ठेवून, गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाला गति देण्याकरिता त्यांनी निधीचा असणारी अडचण दूर करुन निधी उपलब्ध करुन देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे गोवा महामार्गाचे ठेकेदार बदलले गेले आणि कामाला नव्याने गति मिळाली.

आंबा, काजूच्या माध्यमातून कोकणात कृषी समृद्धी

कोकणातील हापूस आंबा आणि काजू हे जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असणारे कृषी उत्पादन असतानाही त्या माध्यमातून कोकणात असलेल्या कृषी समृद्धीच्या संधी वापरल्याच गेलेल्या नाहीत. त्या संधींचे कोकणवासीयांनी सोन केले तर कोकणातील कृषी समृद्धी येवू शकते अशी भूमिका स्विकारुन कोकण कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ, प्रत्यक्ष आंबा-काजू उत्पादक , निर्यातदार यांच्याशी संवाद साधून कृषी आणि फलोत्पादन विकासासाठी आंबा व काजू बोर्डाची निर्मीती केली. हा कोकणातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी घेतलेले सर्वात मोठे निर्णय ठरला. कोकणातील काजू उत्पादकांसाठी स्वतंत्र काजू बोर्डाची स्थापना करून त्यासाठी तब्बल 300 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद त्यांनी अर्थसंकल्पात केली.अवकाळी पाऊस आणि वादळांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी वेळोवेळी विशेष पॅकेज त्यांनी जाहीर केली आहेत.

चक्रीवादळानंतरची सत्वर उपाययोजना

तौक्ते आणि निसर्ग चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्ती नंतर कोकणातील आंबा,सुपारी, नारळ, काजूच्या बागांचे विपरित नुकसान झाले होत.कोकणाला बसलेल्या चक्रीवादळांच्या फटक्यानंतर अजितदाद यांनी प्रशासकीय पातळीवर अत्यंत वेगाने हालचाली केल्या. शासना समोर देखील अशा प्रकारची चक्रीवादळाची परिस्थिती हाताळण्याची पहिलीच वेळ होती. मात्र अजितदादा यांनी वादळाच्या नंतरची परिस्थिती सुधारण्याकरिता केलेले नियोजन महत्वाचे ठरले. पुनर्वसन निधी वाढवण्याकरिता विशेष नियोजने केले. घरांची पडझड आणि बागायतदारांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषांच्या बाहेर जाऊन विशेष आर्थिक मदत मिळवून देण्यात त्यांना यश आले. कोकणातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भूमिगत वीज वाहिन्यांच्या योजनेस निधी उपलब्ध करुन दिला. किनारपट्टीच्या भागात वादळामुळे वारंवार वीज जात असल्याने, वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी त्यांनी कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे.

अजितदादा यांनी अर्थमंत्री म्हणून “कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,“ असे आश्वासन अनेकदा दिले आहे आणि त्यानुसार वार्षिक अर्थसंकल्पात कोकणातील जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीत सातत्याने वाढ केली आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटतासुटत नाही. अशा परिस्थितीत पालकमंत्र्यांच्या अभावी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणाऱ्या योजना थांबून चालणार नाही अशी भूमिका स्विकारुन राज्याचे अर्थमंत्री या नात्यांने त्यांनी रायगड जिल्हा नियोजन समितीचे वार्षीक बजेट आपल्या स्तरावरुन मंजूर करुन रायगड जिल्ह्यातील विकास कामांचे नियमित चक्र थांबू दिले नाही, ही रायगड वासीयांकरिता महत्वाची घटना असून या करिता रायगड मधील विविध पक्षांची नेतृत्वे आणि रायगडवासीय अजितदादांना कधीही विसरु शकणार नाहीत.

पर्यटन आणि मत्स्यव्यवसायातील समस्याचे निराकरण

पर्यटन आणि मत्सव्यवसाय यांतून कोकणात परकीय चलन मोठ्या प्रमाणात येवू शकते. त्यातून ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळू शकते अशा हेतूने अजितदादा पवार यांनी या दोन्ही क्षेत्रांना चालना देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून मोठी चालना दिली. पर्यटन विकासासाठी रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले आणि समुद्रकिनाऱ्यांच्या सुशोभीकरणासाठी विशेष निधी दिला. आणि या किनाऱ्यांचा कायापालटच झाला. त्यातून पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली. दरवर्षी कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्यते झालेली विक्रमी वाढ आणि कोट्यावधी रुपयांचा घरात पोहोचलेला पर्यटन व्यवसाय हे वास्तव आज सर्वासमोर आहे. कोकणातील मत्स्य व्यवसायावर लाखो कुटूंबे अवलंबून आहेत. त्यांचे जीवनमान सुसह्य करुन मत्स्योत्पादनातून परकीय चलनाची बेगमी करण्याकरिता अजितदादा पवार यांनी मुळात मत्स्य व्यवसायीकांच्या असलेल्या समस्या दुर करण्याकरिता प्राधान्य दिले. मच्छिमारांना डिझेल परतावा () मिळवून देण्यासाठी आणि आधुनिक जेटी बांधण्यासाठी त्यांनी अर्थसंकल्पात सातत्याने तरतूद केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT