

नेरळ : नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील माणगाव परिसरात असलेल्या एका गोट फॉर्मला लागलेल्या भीषण आगीत तब्बल साडेतीनशे बकऱ्या, कोंबड्या, कबुतरांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. प्राथमिक तपासात ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून, या आगीत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा मालकांनी केला आहे.
कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील माणगावतर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीत सय्यद मोहम्मद तारीफ यांच्या मालकीचा राबिया गोट फॉर्म असून येथे मोठ्या प्रमाणावर विविध जातीच्या बकऱ्यांचे संगोपन व विक्री केली जाते. दोन मजली इमारतीत बकऱ्यांसाठी खास निवारा शेड उभारण्यात आले होते, तर त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाद्यसाठा व इतर साहित्य साठवून ठेवण्यात आले होते.
रविवारी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील इलेक्ट्रिक बोर्डमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन स्पार्क झाला आणि क्षणार्धात आग भडकली. लाकडी साहित्य, चारा आणि इतर ज्वलनशील वस्तूंमुळे आगीने भीषण रूप धारण केले. दाट धुरामुळे आणि आगीच्या तीव्रतेमुळे अनेक बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर शेड परिसरात असलेली काही कबुतरेही या आगीत मृत्युमुखी पडली.
आगीची माहिती मिळताच फॉर्म मालक, कामगार वर्ग तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संकेत कराळे मित्र परिवार, सनी देशमुख आणि गणेश देशमुख यांनी प्राण्यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतकार्य केले. मात्र बकऱ्यांच्या भोवती लोखंडी जाळी असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली.