

रायगड ः गुन्हे करुन कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या बंदीजनांनी चक्क बुद्धीबळाचा पट मांडून अनेक चाली रचत परस्परांवर मात करत खिलाडूवृत्ती दाखवून दिली.अनेकांनी छान,छान रांगोळी रेखाटत, फुलांची देखणी आरास करत आपल्यातील कलाही दाखवून दिली. निमित्त होते ते अलिबाग जिल्हा कारागृहातील बंदीजनांच्या विविध स्पर्धांचे.आयुष्यात मार्ग चुकलेल्या या बंदीजनांना समाजाच्या प्रवाहात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत विविध उपक्रम राबविले गेले.
26 जानेवारी 2026 रोजी भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिनी देशभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या अनुषंगाने कारागृहातील दाखल बंद्यांना स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची तसेच प्रजासत्ताक दिनाची जाणीव व्हावी तसेच कारागृहातील बंदी सुध्दा या देशाचे नागरिक आहेत त्यांना देशाविषयी आपुलकी वाटावी व स्वत:चा आत्मविश्वास वाढावा याकरीता अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता देशभक्तीपर गाणे, रांगोळी, मेहंदी, चित्रकला स्पर्धा , बुध्दीबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा व देशभक्तीपर निबंध स्पर्धा विविध विशेष स्पर्धा संपन्न झाल्या.
या विविध स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बंद्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी .नेहा भोसले यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले तसेच शिक्षणाधिकारी, (माध्यमिक) महारुद्रा नाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बंद्यांचे भावी जीवनात शिक्षणाचे महत्व सोप्या भाषेत समजावून सांगितले तसेच बंद्यांना कारागृहात दाखल असताना तसेच कारागृहातून सुटून बाहेर पडल्यावर पुढील शिक्षण कसे प्राप्त करता येईल याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची सुरुवात अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह विशाल बांदल यांच्यामार्फत उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन करण्यात आली. या कार्यक्रमाकरिता अधीक्षक.अलिबाग जिल्हा कारागृह,वर्ग-2, विशाल बाळासाहेब बांदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण प्रगती फाऊंडेशन, श्रीवर्धन मंगेश डफळे, व उपाध्यक्ष, प्रबोधन सामाजिक सेवा संस्था अलिबाग, डॉ.मिलींद पाटील, , प्रतिनिधी, प्रयास सामाजिक संस्था,मुंबई ॲड.निलेश मोहिते, प्रबोधन सामाजिक सेवा संस्थेचे प्रशिक्षक प्रांजली अमोल माळी, सतिश मोडखरकर, प्रचिती भगत, श्रीम.हर्षदा दांडेकर तसेच अलिबाग जिल्हा कारागृहातील अधिकारी किशोर महादेव वारगे,तु.अ.श्रेणी-2, निशिगंधा माळी, वैद्यकीय अधिकारी, रामहरी कुटे, सुभेदार व देवलु केरबा रांजड, सुभेदार व तसेच अविनाश जाधव, गजानन खवळे,नितीन भोईर, का.शिपाई तसेच श्रीम. भारती शेवाळे, महिला शिपाई उपस्थित होते.
कैद्यांना आत्मनिर्भर बनवा
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी प्रथम कारागृहातील सर्व बंद्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बंदी कारागृहात दाखल असताना जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा कौशल्य विभाग यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी होवून प्रशिक्षण घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बंद्यांनी या प्रशिक्षणांत सहभाग घेतल्यास बंदी आत्मनिर्भर होवून त्यांना रोजगार उपलब्ध होईल तसेच स्वत:ची व कुटुंबाची जबाबदारी योग्यरित्या सांभाळून त्यांचा उदर निर्वाह करु शकतात असे सांगून बंदी पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त बंद्यांनी हे प्रशिक्षण घेण्याबाबत मार्गदर्शन केले.