येरवडा, पुढारी वृत्तसेवा: लोहगाव-वाघोली रोड हा समस्यांच्या विळख्यात सापडला असून, पाण्याची लाइन व केबल खोदाईमुळे रस्त्यात सर्वत्र खड्डे पडले आहेत. खोदाईकामाचा राडारोडा जाऊन वारंवार ड्रेनेजलाइन तुंबून मैला पाणी रस्त्यावरून वाहत आहे. याचा सर्व ताण वाहतुकीवर पडत असून, रोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
समान पाणीपुरवठाअंतर्गत लोहगाव-वाघोली रस्त्यावर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम जरी रात्रीच्या वेळी सुरू असले तरी खोदाई केलेल्या कामाचा राडारोडा तसाच पडून असल्याने, शिवाय रस्ता पूर्ववत न केल्याने रस्त्यावरून जाणारी वाहने सावकाश चालवावी लागत आहेत. चार्जिंग स्टेशनला वीजपुरवठा करण्यासाठी उच्च दाबाची केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे देखील रस्ताखोदाई सुरूच आहे. त्याचाही राडारोडा पडून असतो.
केबलसाठी देखील खोदाई झाली आहे. या वारंवार रस्ताखोदाईच्या कामामुळे ड्रेनेजलाइनचे चेंबर तोडण्यात आल्याने, शिवाय राडारोडा लाइनमध्ये जात असल्याने दादाची वस्ती, दत्त मंदिर, शुभम मंगल कार्यालयाजवळील चेंबर वारंवार ब्लॉक होऊन तुंबत असल्याने मैलापाणी मुख्य रस्त्यावरून गेल्या तीन दिवसांपासून वाहत होते.
मैलापाणी वाहत असल्याने वाहने जाऊन नागरिकांच्या अंगावर घाण पाणी उडत आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांबरोबर चार्जिंगसाठी रोज तीनशे पीएमटीच्या बस ये-जा करतात. आमदार सुनील टिंगरे म्हणाले, जलवाहिन्या टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रस्त्यासाठी महापालिकेतर्फे तसेच माझ्या आमदार निधीतूनदेखील निधी उपलब्ध झाला असून,रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ केला जाणार आहे.
ड्रेनेजलाइन जेटिंग मशिन लावून स्वच्छ करून घेतल्याने मैलापाणी रस्त्यावरून वाहणारे बंद झाले आहे. खोदाईकामामुळे राडारोडा ड्रेनेजलाइनमध्ये बसत असल्याने वारंवार लाइन तुंबत आहे.
– इरफान शेख, कनिष्ठ अभियंता
हेही वाचा