नगर : राजगिर्‍याचे लाडू शाळेत पोहचलेच नाही..! | पुढारी

नगर : राजगिर्‍याचे लाडू शाळेत पोहचलेच नाही..!

नगर :  पुढारी वृत्तसेवा:  कोरोनाच्या दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. शासनानेही पहिल्याच दिवशी पालक मेळावे, मोफत गणवेश वाटप, छोटा समारंभ घेऊन पाठ्यपुस्तके वितरण, नवगतांना गोड-धोड आहार, गुलाबपुष्प अशा पद्धतीने शाळेच्या पहिल्या दिवशीची कागदावर पूर्वतयारीही केली.

मात्र, प्रत्यक्षात काल शिक्षण विभागाची उदासिनता चव्हाट्यावर आली. काही शाळांमध्ये खास नियोजन केलेले राजगिर्‍याचे लाडू पोहचलेच नाही. तर, अनेक शाळांमध्ये गोड-धोड तर बाजूलाच, साधा खिचडी भातही न मिळाल्याने नवगतांवर पहिल्याच दिवशी उपाशी राहण्याची वेळ आली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेची पहिली घंटा वाजली.

पुणे : कुरवली येथील शेतकर्‍याचा मुलगा नेव्हीत सब लेफ्टनंटपदी

शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी प्रत्येक शाळांना पहिल्या दिवशी राबविण्यात येणार्‍या उपक्रमांबद्दल आठ दिवसांपूर्वीच सूचना दिली होती. यात, पालक मेळावे, नवगतांचे स्वागत, गणवेश वाटप, शालेय पाठ्यपुस्तके वाटप आणि पोषण आहार लाभार्थ्यांना गोड-धोड आहार देण्याबाबतही कळविले होते. पोषण आहार योजनेचे 4 लाख 46 हजार लाभार्थी आहेत.

पहिली ते पाचवीचे 2 लाख 86 हजार 497, तर सहावी ते आठवीचे 1 लाख 90 हजार 233 मुले-मुली लाभार्थी आहे. या मुलांना शाळेत आहार दिला जातो. पहिला दिवस असल्याने शाळेत गोडधोड मिळणार, या आशेने चिमुरडेही उत्साहात शाळेत आले. पालकांनीही नेहमीप्रमाणेच ‘पोषण आहारा’च्या भरवशावर जेवणाचे डबे न देताच मुलांना शाळेत सोडले.

नागपूर : एका तासात 3331 पुशअप मारून नोंदविला विश्वविक्रम

प्रत्यक्षात ज्या ठिकाणी आहार शिल्लक होता, किंवा नवीन आहार आला, त्या शाळांमध्ये गोडधोड जेवणही दिलंही, मात्र काही शाळांमध्ये आहारच शिल्लक नसल्याने अक्षरशः पहिल्या दिवशीच मुलांना गोडधोड नाहीच, साधा खिचडी भातही मिळाला नाही.
एकीकडे थाटामाटात प्रवेशोत्सव साजरे केले जातात, तर दुसरीकडे काही शाळांत मुलांना पहिल्या दिवशी आहार दिला जात नाही, याबाबत सीईओ आशिष येरेकर यांनी चौकशी करून कारवाई करण्याची गरज आहे.

कागदांचा खेळ,प्रशासनाचा अवमेळ!
नवीन शैक्षणिक वर्षात मुलांना जून-जुलैचा पोषण आहार देण्याबाबतचे वरिष्ठांचे पत्र 31 मे रोजी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. त्यानंतर तीन दिवसांनी सीईओंनी मेन्यू ठरविला. 4 जून रोजी पुरवठादाराला मालाची मागणी देण्यात आली.ही प्रक्रिया उशीरा झाली. पहिल्य दिवशी काही शाळांमध्ये जुना मालही शिल्लक नाही आणि नवीनही पोहचला नाही. त्यामुळे ‘त्या’ शाळांमध्ये आहार शिजला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

शिक्षणाधिकारी तुपाशी….!
पहिल्या दिवशी मुलांना पोषण आहारात गोड पदार्थ देण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी सीईओ येरेकर व शिक्षणाधिकारी पाटील यांनी राजगिर्‍याचे लाडू आणि सोबत सांबरभात किंवा वरणभात असा मेन्यू निश्चित केला होता. काल शिक्षणाधिकार्‍यांनी श्रीगोंद्यातील प्रवेशोत्सव कार्यक्रमात गावरान तुपाच्या लापशीचा आस्वाद घेतला; तर आहार संपलेल्या शाळेतील विद्यार्थी मात्र उपाशी राहिला आहे.

‘हंगा येथे प्रवेशोत्सवाचा मोठा कार्यक्रम घेतला. पालक मेळावा घेतला. त्या ठिकाणी मुलांना गोडधोड जेवणही दिले. कदाचित काही ठिकाणी पोषण आहार पोहचला नसेल, तर तेथे लोकसहभागातून आहार दिला असणार. कोणकोणत्या शाळांमध्ये आहार शिजला नाही, याबाबत आपण माहिती घेऊ.
-भास्कर पाटील
शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद?

शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पुस्तके, गणवेश आणि आहार मिळणे अपेक्षित आहे. काही शाळांमध्ये आहार शिल्लक नसल्याने मुलांना उपाशी ठेवले असेल, तर निश्चितच सीईओंनी याबाबत तालुकानिहाय आढावा घेऊन याप्रकरणाची चौकशी करावी, त्यात कुणी दोषी आढळल्यास कारवाई व्हावी.
-राजेश परजणे
माजी सदस्य, जिल्हा परिषद

 

Back to top button