पुणे

विश्रांतवाडीतील दुहेरी खुनाचा छडा; दारूच्या नशेतील दोघांना पाण्यात ढकलून काढला काटा

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गेल्या आठवड्यात विश्रांतवाडी परिसरातील एका खदानीच्या पाण्यात दोघांचे मृतदेह आढळले होते. त्या दोघांचा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पूर्ववैमनस्य आणि मानलेल्या बहिणीला त्रास दिल्याचा जाब विचारल्याच्या कारणातून झालेल्या वादावादीनंतर दोघांना दारू पाजून खदानीमध्ये ढकलून देऊन हे दुहेरी हत्याकांड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी प्रसन्न थुल ऊर्फ गोट्या (वय 21,रा. पंचशीलनगर) याला अटक केली आहे, तर अनिकेत उरणकर ऊर्फ हुर्‍या (वय 24, रा.औंध रोड) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मोहित नानाभाऊ लंके (वय 18, रा. अनिरुद्ध अपार्टमेंट, विश्रांतवाडी) याने फिर्याद दिली आहे.

7 जून रोजी विश्रांतवाडीतील भीमनगर परिसरात राहणारे विकी नानाभाऊ लंके (20) आणि सुशांत गडदे (20) हे दोघे जण बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाइकांनी दिली होती. दरम्यान, शनिवारी (दि.11) दुपारी विश्रांतवाडीतील पाण्याच्या खदानीमध्ये त्यांचे मृतदेह आढळून आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेले लंके, बडदे आणि त्यांचा खून करणारे उरणकर, प्रसन्न थुल हे सर्व एकमेकांच्या ओळखीचे आहेत. यातील लंके हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे.

तर, आरोपीदेखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. लंके याची एक मानलेली बहीण असून, तिचे रोहित डोंगरे नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र, तिला आकाश वाघमारे नावाचा तरुण त्रास देत होता. आकाश त्रास देत असल्याची तक्रार तरुणीने डोंगरे यांच्याकडे केली होती. रोहित आणि लंके मित्र असल्याने आणि लंकेची ती मानलेली बहीण असल्याने त्याने आकाशला जाब विचारला. तसेच त्याला शिवीगाळ केली होती. आकाश आणि अनिकेत उरणकर हे दोघे मित्र असल्याने तरुणीच्या कारणातून लंके याने शिवीगाळ केल्याने उरणकर व लंके यांच्यात वाद झाला होता.

मंगळवारी (दि.7) रात्री उरणकर यानेच थूलला सोबत घेऊन लंके आणि गडदे यांना दारू पाजली. चौघे जण मिळून रात्री साडेतीन वाजेपर्यंत दारू प्याले. दारू पिल्यानंतर चौघेही गप्पा मारत खदानीच्या जवळ गेले. त्याठिकाणी उरणकर याने लंकेशी वाद घालत त्याला हाताने मारहाण केली. मारहाणीनंतर त्याला काठावरून खदानीमध्ये ढकलून दिले.

लंके खाली पडल्यानंतर बडदे याने आरोपीला विरोध केला. दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यालाही खदानीमध्ये ढकलून दिले. पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर, विजय शिंदे, उपनिरीक्षक लहू सातपुते, कर्मचारी दीपक चव्हाण, यशवंत किर्वे, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे, संदीप देवकाते, संपत भोसले यांच्या पथकाने कौशल्यपूर्वक तपास करून खुनाचा छडा लावला.

खूनप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे, तर त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा तपास सुरू असून त्यांना आणखी कुणी मदत केली आहे का ? या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.

            – दत्तात्रय भापकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलिस ठाणे

हेही वाचा

SCROLL FOR NEXT