चला, आळंदीला जाऊ; पालखी सोहळ्यानिमित्त धावणार पीएमपीच्या जादा बस

चला, आळंदीला जाऊ; पालखी सोहळ्यानिमित्त धावणार पीएमपीच्या जादा बस

पुणे, पुढारी वृत्तसेवा: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त 'पीएमपीएमएल'कडून जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यास पुणे शहर/उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी व देहू येथे असंख्य भाविक येत असतात. त्यांच्यासाठी पीएमपीकडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी 18 जून ते 22 जूनपर्यंत आळंदीसाठी स्वारगेट, मनपा, हडपसर, पुणे स्टेशन,

निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून सध्या संचलनात असणार्‍या बस व जादा बस अशा दररोज एकूण 130 बस संचलनात राहणार आहेत. 21 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आळंदीसाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय देहूसाठी पुणे स्टेशन, मनपा, निगडी या ठिकाणावरून सध्याच्या संचलनात असणार्‍या बस व जादा बस अशा एकूण 22 बस पीएमपीकडून सोडण्यात येणार आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा 10 बसचे नियोजन करण्यात आले आहे.

पहाटेपासून बसची व्यवस्था

22 जून रोजी पालखी प्रस्थान आळंदीमधून होत असल्यामुळे पहाटे 3 वाजेपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा या ठिकाणावरून आळंदीला जाण्यासाठी जादा 18 बसची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणार्‍या बस सकाळी 5:30 वाजल्यापासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बसस्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील 101 बसगाड्या आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडीपर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. याशिवाय जादा बसची व्यवस्थाही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासी संख्या किमान 40 आवश्यक) वाढविण्यात येणार आहे.

हडपसरसाठी अशी व्यवस्था

पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस 24 जून रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान थांबणार असल्याने या वेळेस महात्मा गांधी स्थानकातून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी आदी ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे; तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिवे घाट/बोपदेव घाटातील नियोजन

आळंदीतून पंढरपूरकडे पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रोडने मार्गस्थ होईल. या वेळी सोलापूर/उरुळी कांचन मार्ग जसा जसा वाहतुकीसाठी खुला होईल, तसतशी बसवाहतूक चालू ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले. हडपसर ते सासवडदरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पूर्णत: बंद राहणार आहे. तथापि, भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी म्हणून या मार्गांची बसवाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे अशी सुरू ठेवण्यात येणार असून, बसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून अशा 60 जादा बसचे नियोजन करण्यात आलेले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news