पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोरोना प्रादुर्भाव थोडा वाढत असला, तरी शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मास्कसक्ती करण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांना शिकवण्यास येणार्या शिक्षकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले असून, आवश्यकतेनुसार त्यांना दक्षता डोस दिला जाणार आहे.
13 आणि 14 जून रोजी शाळांचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोकळा श्वास घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून शाळा निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सोमवारी (दि. 13) आणि मंगळवारी (दि. 14) या दोन दिवशी शाळेत केवळ मुख्याध्यापक, शिक्षक हजर राहून निर्जंतुकीकरणासह स्वच्छता करून घेणार आहेत. विद्यार्थी शाळेत प्रत्यक्षात बुधवारी (दि.15) उपस्थित राहणार आहेत.
शिक्षण विभागाकडून शाळापूर्व तयारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून शिक्षक शाळेत हजर राहून पूर्वतयारीची कामे पूर्ण करणार आहेत. त्यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक ग्रामस्थांच्या मदतीने शालेय परिसर, वर्गखोल्या, स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणार आहेत. शालेय पोषण आहाराबाबत सर्व बाबी स्वच्छता व पूर्वतयारी करणे, पाण्याची टाकी साफ करणे, नळदुरुस्ती तसेच विद्युतपुरवठा सुरू असल्याची खात्री करून घेतली जाणार आहे.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पाश्र्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहेत. या सर्व सूचनांचे शिक्षकांना पालन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पालकांमध्ये शिक्षक जनजागृती करणार आहेत. हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, त्याचबरोबर मास्क वापरण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने पालकांमध्ये थोडे चिंतेचे वातावरण आहे, तर आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करून शाळा सुरू करण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळा सुरू झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाणार आहे. परंतु, स्कूल व्हॅनचालक आसनक्षमतेपेक्षा अधिक मुले आपल्या स्कूल व्हॅनमध्ये कोंबत असताना दिसून येतो. त्यामुळे नियमानुसार 7 लहान मुलांची वाहतूक स्कूल वाहनचालकांना करावी लागणार आहे. त्यातही कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. वाहनचालकांनी नियम मोडले, तर त्यांच्यावर पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
शाळा सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. त्यानुसार मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन सूचना दिलेल्या आहेत. सध्यातरी मास्कसक्तीचा उल्लेख शासन निर्णयात नाही. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करता येणार नाही. अन्य सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचे पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
– सुनंदा वाखारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी
हेही वाचा