वांबोरीत तुफान पावसाने झोडपले, फळ बागांची मोठी हानी | पुढारी

वांबोरीत तुफान पावसाने झोडपले, फळ बागांची मोठी हानी

वांबोरी : पुढारी वृत्तसेवा: राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दुपारी 3 वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वार्‍यासह बरसलेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालून झोडपून काढले. तब्बल दोन तास संततधार पावसाने तिकडे- तिकडे दाणा-दाण उडवित पाणीच- पाणी केले. दरम्यान, या पावसाने बळीराजा काहीसा सुखावला असला तरी फळबागांचे मात्र मोठे नुकसान झाले.

यंदाचा मान्सून सक्रिय झाल्यानंतर पहिल्याच पावसाने वांबोरी परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी 3 वाजेच्या सुमारास वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह काळ्याकुट्ट ढगांमधून सुमारे दोन तास चाललेल्या संततधार पावसाने काही मिनिटातच नांगरलेल्या शेतामध्ये पाणीच- पाणी केले. या परीसरातील ओढे-नाले दुथडी भरून वाहिले.

अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे बांध फोडत पाण्याने वाट मोकळी केली. काही ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी घरांची पत्रे उडाल्याचे सांगण्यात आले. मोसमाच्या पहिल्याच पावसामुळे बळीराजा सुखावला, मात्र आंबा, डाळिंब, संत्रा ,मोसंबी, पेरू, चिकू यासारख्या फळबागांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला आंबा वादळी वार्‍यामुळे पडल्याने हाणी झाली आहे.

दरम्यान, या नुकसानीचा अंदाज बांधणे शक्य नाही. त्यामुळे फळबाग शेतकर्‍यांमधुन नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वांबोरी येथील पटारे, पागीरे वस्ती परिसरातील सयाजी पागीरे व तुळशीराम पागीरे यांच्या घरांचे पत्रे उडाल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. या परिसरामध्ये अनेक ठिकाणी जनावरांच्या शेडची पत्रे उडाली आहेत. परसराम पागीरे यांच्या दुचाकीवर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास शेतकर्‍यांच्या हातून हिसकावला गेला आहे.

Back to top button