मुळा पाणीप्रश्नी 14 पासून किसान सभेचा सत्याग्रह | पुढारी

मुळा पाणीप्रश्नी 14 पासून किसान सभेचा सत्याग्रह

अकोले : पुढारी वृत्तसेवा : मुळा खोर्‍यातील पाण्याचे समन्यायी पुनर्रवाटप करून अकोले विधानसभा मतदार संघातील आदिवासी व बिगर आदिवासी जनतेला शेती व पिण्यासाठी पाण्याचा रास्त वाटा द्या, हिरड्यांची सरकारी खरेदी सुरू करा, कोतुळ आंदोलनात मान्य केलेल्या रस्त्यांची कामे तत्काळ सुरू करा.

तोलार खिंड फोडून परिसराला मुंबई बाजारपेठेशी जोडा, शेती व वस्तीसाठी वीज द्या या प्रमुख मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने येत्या 14 जून रोजी कोतुळ येथील मुख्य चौकात सत्याग्रह सुरू करण्यात येत आहे. पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याबाबत कोतुळ खोर्‍यात संघर्ष सुरू आहे. आंदोलक आपल्या परिसरातील जनतेची बाजू घेऊन संघर्ष करत आहेत. पिंपळगाव खांड धरणात साठलेले ओंजळभर पाणी वाटण्यावरून परिसरात तणाव आहे. मुळा धरणाच्यावर हरीश्चंद्र गडाच्या पायथ्यापर्यंत पाण्याचा साठा अत्यल्प असल्याचे वास्तव आहे. किसान सभेकडून पाणी प्रश्ना बरोबरच आदिवासी भागात सरकारी हिरडा खरेदी तातडीने सुरू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

कोतुळ येथे मोर्चा..!
14 जूनला सुरू होणार्‍या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 15 जून रोजी किसान सभेच्या वतीने कोतुळ येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे काँ. डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे व एकनाथ मेंगाळ यांनी सांगितले.

Back to top button