पुणे

राज्याचा बारावी निकाल जाहीर, यंदा निकालात ८.५७ टक्क्यांची वाढ

दीपक दि. भांदिगरे

पुणे; पुढारी ऑनलाईन : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी निकाल आज मंगळवारी जाहीर झाला. बारावी निकाल ९९.६३ टक्के एवढा लागला आहे. यंदा बारावीच्या निकालात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही वाढ ८.५७ टक्के एवढी आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन केले होते. त्यानुसार निकाल जाहीर करण्यात आला आहे.

राज्यात नऊ विभागीय मंडळे आहेत. या मंडळांमधून १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

एकूण उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९९.५४ एवढी आहे. तर ९९.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. राज्याचा एकूण निकाल ९९.६३ टक्के एवढा लागला आहे.

अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण यानुसार निकाल जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील. सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

www.mahresult.nic.inhttps://msbshse.co.in या संकेतस्थळावर निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध करण्यात आला आहे.

…तर विद्यार्थ्यांना पुढील एक /दोन संधी उपलब्ध…

दि.२ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक /दोन संधी उपलब्ध राहतील.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT