शनी ची झाली पृथ्वीशी ‘भेट’! | पुढारी

शनी ची झाली पृथ्वीशी ‘भेट’!

भुवनेश्वर ; शनी ग्रह सोमवारी पृथ्वीच्या अतिशय जवळ आला आणि या दोन ग्रहांची अशी जवळून ‘भेट’ झाली. ही खगोलीय घटना महिनाभर सुरू राहणार असून खगोलप्रेमींना ती पाहण्याची संधी मिळत राहणार आहे.

मात्र, दोन्ही ग्रहांमधील आजच्या इतके कमी अंतर पुढे असणार नाही. सोमवारी शनी, पृथ्वी आणि सूर्य एकाच रेषेत होते आणि या घटनेला ‘सॅटर्न अ‍ॅट अपोझिशन’ असे म्हटले जाते.

पठानी सामंत प्लॅनेटोरियमचे डेप्युटी डायरेक्टर सुवेंदू पटनायक यांनी सांगितले की भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेअकराच्या सुमारास शनी आणि पृथ्वी एकमेकांच्या अतिशय जवळ आले.

भारतात यावेळी दिवस असला तरी ज्या देशांमध्ये रात्रीची वेळ होती त्यांना हे द़ृश्य अधिक चांगल्याप्रकारे पाहण्याची संधी मिळाली. यावेळी शनी अधिक मोठा आणि चमकदार दिसून येतो. दुर्बिणीतून पाहिल्यावर शनीची रिंग 18 अंशांत झुकलेली दिसून येते.

तो 0.2 मॅग्निट्यूडच्या प्रकाशासह आकाशात दिसून येतो. रात्री 7 वाजून 51 मिनिटांनी तो आकाशात उदयास आला आणि रात्रभर दिसत होता. पृथ्वीला सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागत असले तरी शनीला असे करण्यासाठी 29.5 वर्षे लागतात.

आपल्या कक्षेतून भ्रमण करीत असताना पृथ्वी आणि शनी वर्षातून एकदा जवळ येतात. अचूकपणे सांगायचे तर एक वर्ष आणि 13 दिवसांच्या अंतराने हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ येतात. यापूर्वी जुलै 2020 मध्ये पृथ्वी आणि शनी एकमेकांच्या अतिशय जवळ आले होते आणि आता यापुढे 14 ऑगस्ट 2022 ला ते जवळ येतील.

ज्यावेळी हे दोन्ही ग्रह अतिशय जवळ येतात त्यावेळीही त्यांच्यामधील अंतर 120 कोटी किलोमीटरचे असते. पृथ्वी आणि शनीमधील सर्वाधिक अंतरापेक्षा हे 50 कोटी किलोमीटरने कमी अंतर आहे. दोन्ही ग्रह सहा महिन्यांनंतर एकमेकांपासून सर्वाधिक अंतरावर जातील.

Back to top button