अनोख्या सागरी जीवांचे जीवाश्म | पुढारी

अनोख्या सागरी जीवांचे जीवाश्म

लंडन : पृथ्वीच्या इतिहासात असे अनेक जीव होते जे आता लुप्त होऊन गेले आहेत. ब्रिटनच्या कॉस्वल्डस क्षेत्रात अशा जीवांचा एक ‘खजिना’ संशोधकांना गवसला आहे. तिथे ज्युरासिक काळातील अनोख्या सागरी जीवांचे जीवाश्म सापडले आहेत. याठिकाणी लाखोंच्या संख्येत असे जलचर होते ज्यांना पाठीचा कणा नव्हता. अशा अपृष्ठवंशीय जलचरांचे जीवाश्म येथे सापडले आहेत.

या जीवांमध्येच सध्याच्या तारामासा (स्टारफिश), सी कुकुंम्बर, सी अर्चन आणि सी लिलीजसारख्या जीवांच्या पूर्वजांचा समावेश आहे. संशोधकांनी म्हटले आहे की एखाद्या रहस्यमय आपत्तीमुळे ही अनोखी जीवसृष्टी एकाचवेळी नष्ट होऊन गेली.

सुमारे 16.7 कोटी वर्षांपूर्वी भूकंपासारख्या घटनेमुळे आलेल्या भूस्खलनात हे जीव दफन होऊन गेले आणि आता त्यांचे सुरक्षित जीवाश्म सापडले आहेत.

होलिंगवर्थ आणि त्यांची पत्नी सॅली यांनी या जीवाश्माचा शोध लावला आहे. लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील सिनिअर क्युरेटर टिम एविन यांनी सांगितले की हे जीव त्या काळात स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत असावेत. मात्र, ते जिवंत दफन झाले. नेमक्या कोणत्या घटनेने असे घडले हे स्पष्ट झालेले नाही.

जर मातीच्या खाली सामान्य प्रक्रियेने ते गाडले असते तर त्यांचे जीवाश्म बनले नसते. हे जीवाश्म ज्याठिकाणी सापडले ते 20 कोटी ते 14.5 कोटी वर्षांपूर्वीच्या ज्युरासिक काळातील आहे. त्यावेळी समुद्रांमध्ये बदलाचा काळ होता. निम्म्यापेक्षा अधिक जलचर या काळातील विनाशकारी घटनांमध्ये नष्ट होऊन गेले.

Back to top button