पुणे

बारामती : युवकाच्या आत्महत्येप्रकरणी महिलेवर गुन्हा

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा

गत महिन्यात शहरातील लेंडीपट्टा भागात अमीर शकूर काझी (वय 30) या युवकाने राहत्या घरात लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी शहरातील एका महिलेविरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

'तू माझ्याशी संबंध तोडले, तर मी तुझ्यावर बलात्काराची केस टाकेन. तुझ्या घरच्यांच्या नावे चिठ्ठी लिहून त्यांना जेलमध्ये टाकेन,' अशी धमकी या महिलेकडून दिली जात असल्याने अमीरने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अमीरच्या पत्नीने याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दि. 19 मे रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास शहरातील लेंडीपट्टा भागात राहणार्‍या अमीरने राहत्या घरात दरवाजा बंद करीत आत्महत्या केली होती. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. तिने दिलेल्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अमीरने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गेल्या एक वर्षापासून ही महिला अमीरला मानसिक त्रास देत होती. तिने फोन केला की लागलीच त्याला तिच्या घरी जावे लागत होते. कुटुंबीयांनी त्याला यासंबंधी वारंवार संबंध तोडण्यास सांगितले. परंतु, संबंधित महिलेकडून त्याला प्रचंड मानसिक त्रास दिला जात होता.

दि. 18 रोजी अमीर हा अतिशय चिंतेत होता. त्या वेळी त्याच्या पत्नीने त्याला कारण विचारले असता त्याने ती बाई मला प्रचंड त्रास देत आहे. तू माझ्या मनाप्रमाणे वागला नाहीस, तर तुझ्यावर बलात्काराची केस दाखल करेन, शिवाय चिठ्ठी लिहून तुझ्या घरच्यांनाही जेलमध्ये पाठवेन, अशी धमकी ती देत असल्याचे अमीरने सांगितले होते. दरम्यान, दि. 19 रोजी तो गॅरेजमधून चिंताग्रस्त होऊन घरी आला. त्या वेळी तो फोनवर बोलत होता. पत्नीने विचारणा केली असता, ती बाई मला घरी बोलवत असून, तिच्या त्रासामुळे मी कंटाळल्याचे तो म्हणाला. घरात जात दरवाजा बंद करीत त्याने गळफास घेतला होता.

SCROLL FOR NEXT