पुणे

पॉझिटिव बातमी : चार वर्षात साडेतेवीस हजार प्राण्यांचे दहन

अमृता चौगुले

हिरा सरवदे

पुणे:  शहरातील लहान मोठ्या मृत प्राण्यांची व जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या इन्सिनरेटर प्रकल्पाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रकल्पामध्ये चार वर्षात 23 हजार 526 लहान मोठ्या प्राण्यांचे व जनावरांचे दहन करण्यात आले आहे. शहरातील लहान मोठी प्राणी आणि जणावरे मरण पावल्यानंतर ती आडबाजून टाकली जात होती. त्यामुळे परिसरात दुर्घंगी सुटल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असे.

नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून उचलली जात असत मात्र, त्यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न निर्माण होत असे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मृत लहान प्राण्यांची आणि मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी नायडू रुग्णालय परिसरातील डॉग पॉण्ड लगत दोन स्वतंत्र इंन्सिनेरेटर प्रकल्प उभारले आहेत. लहान प्राण्यांचा प्रकल्प जून 2018 मध्ये तर जनावरांचा डिसेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आले.

या प्रकल्पांमध्ये पाळीव लहान प्राण्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येकी 2 हजार रुपये आणि जनावरांसाठी प्रत्येकी 3 हजार रुपये आकारले जातात. तर शहरातील भटक्या व मोकाट मृत प्राणी आणि जनावरांची मोफत विल्हेवाट लावली जाते. भटक्या व मोकाट मृत प्राणी आणि जनावरे इन्सिनेरेटर प्रकल्पापर्यंत पोहचविण्यासाठी महापालिकेने एका ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. या ठेकेदाराने ऑक्टोंबर 2019 पासून 1 हजार 62 मोठी जनावरे तर 10 हजार 609 लहान प्राण्यांची विल्हेवाट लावल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले आहे. दरम्यान, महापालिकेच्या या प्रकल्पाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील चार वर्षात या दोन्ही प्रकल्पामध्ये 23 हजार 526 मृत प्राण्यांची व जनावरांचे दहन करण्यात आले आहे.

इंन्सिनेरेटर प्रकल्पात दहन केलेल्या लहान प्राण्यांची संख्या
2018 (जून ते डिसेंबर) – 1,525
2019 – 6,324
2020 – 5,226
2021 – 5,170
2022(जाने. ते मे) – 2,353
एकूण – 20,598

इंन्सिनेरेटर प्रकल्पात दहन केलेल्या जनावरांची संख्या
2018 (डिसेंबर) – 10
2019 – 1,065
2020 – 554
2021 – 963
2022(जाने. ते मे) – 336
एकूण – 2,928

इंन्सिनेरेटर प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रकल्पामुळे पाळीव आणि भटक्या मृत प्राण्यांची व जनावरांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रीया सुलभ झाली आहे. यामध्ये नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे नागरिकांनी मृत प्राणी किंवा जनावरे आड बाजूला फेकून न देता, ती त्यांची इंन्सिनेरेटर प्रकल्पात त्यांचे दहन करावे.

                           – डॉ. सारीका फुंडे, मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT