पुणे

पेट्रोल, सीएनजी पंपाला ग्रीन बेल्टमध्ये परवानगी नाही

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महापालिका हद्दीतील हरित झोनमध्ये (ग्रीन बेल्ट) पेट्रोल पंप, सीएनजी पंप इत्यादी बाबींना परवानगी देता येणार नसल्याचे नगररचना विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. डोंगर माथा, डोंगर उतारावरही हाच नियम लागू राहणार असून, यामुळे नदीकाठच्या ग्रीन बेल्टमध्ये सुरू असलेले विविध व्यवसायही बेकायदा असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे.

महापालिकेच्या विकास आराखड्यात नदीकाठ, नालेकाठ परिसरात आणि डोंगर माथा व उतार हा भाग ग्रीन बेल्ट म्हणून आरक्षित आहेत. तर, समाविष्ट 23 गावांमधील डोंगर माथा व उताराचा भाग जैववैविध्य उद्यान (बीडीपी) म्हणून आरक्षित आहे. ग्रीन बेल्टमध्ये क्लब हाऊससह अन्य काही बांबीसाठी चार टक्के परवानगी आहे, तर बीडीपीत मात्र शून्य टक्के बांधकामास परवानगी आहे.

दरम्यान, वडगाव बु. येथील स. नं. 1 या ग्रीन बेल्ट झोनमध्ये समाविष्ट असलेल्या जमिनींमध्ये पेट्रोल पंप, सीएनजी पंप, क्लब हाऊस करण्याचा तसेच पालिका हद्दीतील डोंगर माथा व उतार (हिल स्टॉप व हिल स्लोप) या विभागांमध्ये समाविष्ट मिळकतींवर पेट्रोल पंप व सीएनजी पंप सुरू करण्यासंबंधीच्या परवानगीचे प्रस्ताव पालिकेकडे आले होते.

त्यावर पालिका प्रशासनाने नगररचना विभागाकडून अभिप्राय मागविला होता. त्यानुसार नगररचना विभागाचे सहसंचालक पद्माकर पाटील यांनी मंजूर विकास योजनेनुसार ग्रीन बेल्टमध्ये समाविष्ट असलेल्या जमिनींमध्ये अनुज्ञेय असलेले वापर लक्षात घेता पेट्रोल पंप, सीएनजी पंप यास परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

'त्या' प्रस्तावावर अद्याप निर्णय नाही

महापालिकेच्या जुन्या हद्दीतील डोंगर व टेकड्यांवर ग्रीन झोन आहे. त्यावर हा निर्णय लागू होणार आहे. दरम्यान, या ग्रीन बेल्टमध्ये 10 टक्के बांधकामास परवानगी देण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. मात्र, त्यावर शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही, तर संपूर्ण राज्यासाठी जी एकत्रित बांधकाम विकास नियंत्रण नियमावली आहे, त्यामध्येही या जमिनीवर किती टक्के बांधकामाला परवानगी द्यायची, यासंबंधीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे सद्य:स्थितीला डोंगर माथा व उतारावरही पेट्रोल पंप, सीएनजी पंप यांना परवानगी देता येणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT