हडपसर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रॅव्हल्सच्या आडमुठ्या धोरणाने खासगी ट्रॅव्हल्स बसने हडपसरमध्ये मुख्य रस्त्यावरच अनधिकृत घेतलेले थांबे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याने या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी अनेक वेळा दोन ट्रॅव्हल बसमध्ये अडकून अपघातही झाले आहेत. रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत या खासगी ट्रॅव्हल बस रस्त्याच्या एक तृतीयांश भागापर्यंत उभ्या राहत आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते, तर सोसायटीधारकांना घरी ये-जा करताना वादाला तोंड द्यावे लागत आहे.
विशेष म्हणजे वाहतूक पोलिस कर्मचारी येथे असतानाही तासनतास या खासगी ट्रॅव्हल बसेस रस्त्यावर वाहतुकीस अडथळा करून उभ्या असतात. याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. हडपसर येथील पुणे- सोलापूर महामार्ग हा वर्दळीचा आहे. याशिवाय वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब आहे. त्यात खासगी ट्रॅव्हल बसेस रस्त्यावर उभ्या राहत असल्याने वाहतूक कोंडीसह अपघातास निमंत्रण मिळत आहे.
खासगी ट्रॅव्हल बसेसला दुसरीकडे थांबे देण्यात यावेत, या बसेसवर नियमित कारवाई करण्यात यावी, हे अनधिकृत थांबे वर्दळीच्या हद्दीबाहेर हलवावे, वैयक्तिक मालकीची जागा भाड्याने घेऊन तेथूनच या ट्रॅव्हल बसेस सोडण्यात याव्यात, अशा अनेक उपाययोजनांवर पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार व तज्ज्ञांच्या उपस्थितीत वारंवार चर्चा व बैठका घेतल्या गेल्या. मात्र, या बैठकांनतर अवघ्या आठवड्यात पुन्हा या खासगी ट्रॅव्हल्स मुख्य रस्त्यावर येऊन थांबतच आहेत. त्यामुळे वाहनचालक, सोसायटीधारक स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.
याबाबत येथील स्थानिक नागरिकाच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. नोबेल हॉस्पिटलच्या मागील बाजूस जे वाहनतळ आहे . तेथे रात्रीच्या वेळेस लक्झरी बस माफक दरात थांबवण्यासाठी व्यवस्था करावी..पुणे-सोलापूर महामार्गावर कोणतीही लक्झरी टुरिस्ट गाड्या, टेम्पो ट्रॅव्हलर, खासगी वाहतूक करणारी वाहने थांबून देऊ नयेत. असे स्थानिक नागरिक आनंद दसूरे यांनी सांगितले.
मगरपट्टा चौक व पुढे सावली कॉर्नर, आर्यन सेंटर, गाडीतळ पीएमपी बिल्डिंग, हॉटेल प्रणाम समोर, रविदर्शन, हडपसर आकाशवाणी आणि पंधरा नंबर चौकाच्या अलीकडे अशा परिस्थितीच मुख्य रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल चालकांनी बसचे थांबे केले आहेत. मात्र, त्याकडे कुणी लक्ष देत नसल्याने ही बाब गंभीर होत आहे. येथे अपघाताची शक्यता आहे. संध्याकाळनंतर बस थांबतात.
एसटी बस चा संप होता, त्याकाळात अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करता येत नव्हती मात्र, नो पार्किंग, वाहतुकीस अडथळा अशी नियमित कारवाई करून सुमारे एक ते दीड हजाराचा दंड वसूल केला जात आहे. वेळोवेळी कारवाई करून ट्रॅव्हल्स येथे थांबवू नये यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. पोलिस कर्मचारी थांबून या ट्रॅव्हल्स पुढे नेण्याच्या सूचना देत असतात.
– मनीषा झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर वाहतूक शाखा.