सांगवी : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील सांगवी परिसरात दररोज काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होत आहे. परंतु, जलधारा बरसत नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच शेतातील उभ्या ऊसपिकांच्या वाढीवर परिणाम होऊ लागला आहे.
सांगवी परिसरात 1 जून रोजी 37 मिमी पाऊस झाला होता. तेव्हापासून आजतागायत एकही समाधानकारक पाऊस झाला नाही. आकाशात दररोज काळ्याकुट्ट ढगांची दाटी झालेली दिसते. विजा चमकतात. परंतु, पाऊस काही पडत नाही. यामुळे शेतकर्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे.
सुदैवाने निरा नदीच्या बंधार्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने नदीकाठच्या शेतातील उभ्या पिकांना फारसा धोका नाही. तसेच सांगवी भागातील उर्वरित परिसरात निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. बहुतांश शेतकर्यांनी सोयाबीन व इतर पिकांच्या पेरणीसाठी बियाणे खरेदी करून ठेवले आहे. यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे जमिनीची धगच अजून शमली नसल्याने शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.
माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस लागवडीचा हंगाम सुरू झाला आहे. बहुतांश शेतकर्यांनी शेताची मशागत करून सर्या काढून ठेवल्या आहेत. उसाच्या लागवडीची सर्वच ठिकाणी धांदल सुरू आहे. परंतु, पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.