पुणे

पुणे : शेतीपंप जळण्याचे प्रमाण वाढले

अमृता चौगुले

वडगाव निंबाळकर : पुढारी वृत्तसेवा

महावितरणकडून निर्धारित दाबापेक्षा उच्च दाबाने वीज दिली जात असल्याने बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात शेतीपंप जळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महावितरणच शेतीपंप नादुरुस्त होण्यास जबाबदार असल्याचा आरोप येथील शेतकरी विनोद ज्ञानदेव खोमणे यांनी केला आहे.

हा सर्व परिसर बागायत असून, कालवा व विहिरींना मुबलक पाणी असल्याने ऊसलागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. वीजवितरण कंपनीच्या वतीने दिलेली वीज आठ तास पुरेशी मिळत नाही. त्यामुळे पिके जगविण्यासाठी सिंगल फेज विजेचा पंप खरेदी करून पाणी उपसा करून पिके जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. मात्र, वीजवितरणने शेतकर्‍यांनी असे पंप वापरू नयेत म्हणून जास्त दाबाने वीजपुरवठा करून पाण्याचे पंप जाळण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे होत असलेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानीला महावितरणचे वडगाव निंबाळकर कार्यालय जबाबदार असल्याचे शेतकर्‍यांचे मत आहे.

पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होत नसल्याने निर्धारित वेळेत पिकांना पाणी देणे होत नसल्याने शेतकरी इतर वीजपंप वापरत आहेत. यात चूक काय? नेमके आम्ही काय करायचे? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. या बाबीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

रोहित्राच्या दुरुस्तीसाठी शेतकर्‍यांना वर्गणी गोळा करावी लागते. महावितरणकडून साधी फ्यूजची तारसुद्धा दिली जात नाही. त्यामुळे साहित्य नेमके जाते कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. जास्त दाबाने मुद्दाम वीजपुरवठा करून शेतकर्‍यांच्या पंपांचे नुकसान केले जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

SCROLL FOR NEXT