पुणे

पहिलीपासूनच विद्यार्थी होतील विचारप्रवण; मराठी, इंग्रजी, गणित विषय एकाच पुस्तकात

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: यंदा पहिलीच्या पुस्तकात विद्यार्थ्यांच्या कृतीला आणि विचारांना प्राधान्य देण्यात आले आहे. पहिलीपासूनच विद्यार्थी कृतिशील घडविण्यावर भर देण्यात आला असून मराठी, गणित, इंग्रजी अशा तिन्ही विषयांचे एकच पुस्तक आहे. त्यामुळे घोका आणि ओका या शिक्षण पद्धतीतून बाहेर पडून विद्यार्थ्यांना खेळू, करू, शिकू असे कृतिशील शिक्षण मिळणार आहे.

राज्यात शालेय शिक्षणाचा श्रीगणेशा 15 जूनपासून होणार आहे. यंदा पहिल्यांदाच पहिलीचे नवीन पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक व द्विभाषिक नावाने मराठीचे तीन विषयांचे एकत्रीकरण असलेल्या चार भागांचे पुस्तक तयार करण्यात आले आहे. तीन महिने एक पुस्तक असे वर्षभर चार पुस्तके विद्यार्थ्यांना वापरता येतील. त्यामुळे तीन महिने एकच वही आणि एकच पुस्तक घेऊन विद्यार्थी वर्गात हजर राहतील. त्यामुळे आपोआपच दप्तराचे ओझे कमी होणार आहे.

एकात्मिक दृष्टिकोनावर आधारित एकात्मिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती व अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. आर्ट इंटिग्रेटेड आणि स्पोर्ट इंटिग्रेटेड दृष्टिकोनाचा विचारही पाठ्यपुस्तकात आहे. बालकांमध्ये वय वर्ष आठपर्यंत एकाच वेळी अनेक भाषा शिकण्याची क्षमता असते, याचा विचार करून पाठ्यपुस्तकात गरजेनुसार द्विभाषिक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.

पुस्तकातील विषयांचा आशय मी आणि माझे कुटुंब, पाणी, प्राणी, वाहतूक व आपले मदतनीस या विशिष्ट विषय सूत्रांभोवती गुंफलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या परिसरातून पाठ्यपुस्तकातील आशय स्पष्ट होणार आहे. विदयार्थ्यांच्या अनुभवांवर आधारित उदाहरणांसह आशय स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी आणि भावविश्वाशी निगडित असलेल्या अनुभवांना आशयाची जोड देऊन आणि चित्रे, रंग यांचा वापर करून पाठ्यपुस्तक आकर्षक करण्यात आले आहे.

विदयार्थ्यांच्या कृतीला आणि विचाराला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक आशय हा अध्ययन निष्पत्तीला जोडण्यात आलेला आहे. कृती, खेळ, कोडी, चित्रकला, गोष्टी आणि गाणी यांचा उपयोग करून अध्ययन-अध्यापन आनंददायी होण्यासाठीचा प्रयत्न या पाठ्यपुस्तकात केलेला आहे. त्यामुळे पहिलीचे विद्यार्थी कृतिशील होण्यास मदत होणार आहे.

पाठ्यपुस्तकात प्रथमच इमोजीचा वापर

पाठ्यपुस्तकात प्रथमच अनेक प्रतीकांचा (इमोजी) उपयोग करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रतीके पाहूनच विदयार्थ्यांना कोणती कृती करायची याचा बोध होतो. विचारक चाव्या आणि सहा थिंकिंग हॅट्स यांचा वापर करण्यात आलेला आहे. याद्वारे विदयार्थ्यांच्या विचारांना आणि कल्पनांना चालना मिळणार आहे. त्यामुळे इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, विश्लेषणात्मक विचार, तार्किक विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी विकसित होण्यास मदत होणार आहे.

गाण्यांमधून शिका संख्या

गणित हा विषय तसा किचकट आहे. परंतु पहिलीच्या पुस्तकात गाण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संख्या शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर काय करायला हवे आणि काय नको हे चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थी शिकणार आहेत. तर रोजच्या ओळखीतल्या वस्तूंवरून आकडेमोड करणार आहेत. यातून विद्यार्थी कृतिशील होण्याबरोबरच अध्ययनात प्रगती करणार असल्याचे दिसून येत आहे.

एकाच पुस्तकामुळे विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे. विद्यार्थी लहान असतात. त्यामुळे एकच वही आणि एकच पुस्तक शाळेत त्यांना नेता येईल. पुस्तकात कृतीवर भर असल्यामुळे विद्यार्थी कृतिशील होण्यास मदत होईल.

           एक मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, हवेली तालुका

हेही वाचा

SCROLL FOR NEXT