म्हसवड : इच्छुकांची गोची; काहींची खुलली कळी | पुढारी

म्हसवड : इच्छुकांची गोची; काहींची खुलली कळी

म्हसवड; पोपट बनसोडे :  राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या म्हसवड नगरपालिकेची आरक्षण सोडत सोमवारी पार पडली. या आरक्षणामध्ये दहा प्रभागांपैकी दोन प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. तर 10 प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांची गोची झाली आहे, तर काही जणांची कळी खुलली आहे.

म्हसवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या सभागृहात सोमवारी सकाळी 11 वाजता पार पडली. यावेळी 20 पैकी दोन जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक तीन व चार हे अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत तर प्रभाग क्रमांक एक हा अनुसूचित जाती सर्वसाधारण राहिला आहे.

तसेच वीस पैकी आठ सर्वसाधारण महिला तर 9 सर्वसाधारण नगरसेवक निवडले जाणार आहेत.प्रभाग क्रमांक एक, तीन व चार या प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून प्रभाग क्रमांक तीन व चार अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाला आहे. तर प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे. तसेच प्रभाग पाच ते दहा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. सोमवारी झालेली आरक्षण सोडत कोणाच्या पथ्यावर पडली आहे, तर काहींची या आरक्षण सोडतीमुळे निराशा झाली आहे.

Back to top button