पुणे

दांड्या मारूनही शिक्षकांना नियमित पगार; अतिदुर्गम खोपडेवाडी शाळेतील प्रकार

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा: अतिदुर्गम अशा वेल्हे तालुक्यातील खोपडेवाडी शाळेवर मीनाक्षी चव्हाण व शरद मुळे या दोन शिक्षकांची नेमणूक आहे. दरमहा प्रत्येकी 70 हजारांपेक्षा अधिक पगार घेणारे हे दोन्ही शिक्षक शाळेला दांड्या मारत आहेत. याबाबत आदिवासी समाजाने वारंवार तक्रार करूनही कामचुकार शिक्षकांना नियमित पगार देण्यात आला आहे. 19 जूनपर्यंत दाखल पात्र विद्यार्थ्यांची माहितीही त्यांनी भरलेली नसल्याचे पुढे आले आहे.

दरम्यान मागील तीन वर्षांपासून आठवड्यातील तीन दिवस एक शिक्षक शाळेवर येत आहे. त्यानंतर दुसरा शिक्षक तीन दिवस येतो. रजेचा अर्ज शाळेत न ठेवता दोन्ही शिक्षक परस्पर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या मूक संमतीने परस्पर रजेवर जात आहेत. शिक्षण विभागाच्या संगनमताने गोरगरीब आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणार्‍या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अन्यथा जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर सत्याग्रह करण्याचा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे.

या शाळेतील विद्यार्थी संख्या अवघी 14 आहे. गेल्या तीन वर्षांपासून शुक्रवारनंतर थेट सोमवारीच शाळा उघडली जात आहे. प्रत्येक शनिवारी शाळा बंदच असते, याबाबत आदिवासी समाजाने केंद्रप्रमुखापासून पंचायत समितीपर्यंत वांरवार तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. नवीन वर्षात शाळा बंद असल्याने इयत्ता पहिलीच्या दाखलपात्र विद्यार्थी माहिती भरली नाही. दोन वर्षापासून शालेय व्यवस्थापन समितीची एकही बैठक झालेली नाही. विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहाराचा तांदूळ आजही पडून आहे.

दुसर्‍या शाळेत इयत्ता पाचवीत प्रवेश घेण्यासाठी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना दाखलेही मिळाले नाहीत, हे आता उघड झाले आहे.
गुरुवारी (दि. 23) व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र जोरकर, उपसरपंच नारायण जोरकर, गणपत जोरकर, शिवाजी जोरकर, अण्णा जोरकर, संपत जोरकर, तानाजी जोडकर, भिवाजी जोडकर, गुंडाजी जोरकर, आनंता जोरकर, प्रकाश शिरोळकर, दिनकर जोरकर,
ज्ञानोबा जोरकर आदी आदिवासी बांधवांनी गटशिक्षणाधिकार्‍यांसमोर कामचुकार शिक्षकांच्या गैरकारभाराचा पाढा वाचला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT