पुणे : पुढारी वृत्तसेवा: ग्राहक आयोगाने दिलेल्या आदेशाची पूर्तता न करणार्या व्यंकटेश विजय बिल्डरसह चार भागीदारांना जिल्हा ग्राहक आयोगाने दणका देताना तीन महिन्यांच्या कारावासाची; तसेच 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आयोगाचे अध्यक्ष उमेश व्ही. जावळीकर आणि सदस्य क्षितिजा कुलकर्णी यांनी हा आदेश दिला. व्यंकटेश विजय बिल्डरचे भागीदार रमेश रामू (रा. पौड रस्ता), विमल एस. चसवाल (रा. रास्ता पेठ), संजू आर कुसाळकर ( रा. गोखले रस्ता, वडारवाडी) राम दत्तात्रय मुदलियार (रा. बंडगार्डन) यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी कुंदन रूपगीर गोसावी (रा. रास्ता पेठ) यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे 14 नोव्हेंबर 2014 मध्ये अर्ज दाखल केला होता. तक्रारदार गोसावी हे मूळ जागा मालकांपैकी एक आहेत. त्यांनी व इतर मालकांनी त्यांच्या मालकीची रास्ता पेठ येथील सी.टी.एस नं. 342 ही जागा 2000 साली व्यंकटेश विजय बिल्डर्स या भागीदारी संस्थेने या जागेवर शारदा प्लाझा या नावाने प्रोजेक्ट उभारला.परंतु, कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्याने तक्रारदार गोसावी यांनी तक्रार दाखल केली होती.
त्यावर आयोगाने ही तक्रार अंशत: मंजूर करून बिल्डरांना सर्व कामे 6 आठवड्यांत पूर्ण करून देण्याचा आदेश 7 ऑगस्ट 2014 ला दिला होता. मात्र, बिल्डरांनी आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याने गोसावी यांनी अंमलबजावणीचा अर्ज 14 नोव्हेंबर 2014 रोजी अॅड. विशाल देशमुख व अॅड. उत्तम ढवळे यांच्यामार्फत दाखल केला. या प्रकरणात प्रतिवादी बिल्डरला न्यायालयाने शिक्षा सुनावली.
हेही वाचा