कोकण : दापोली मतदारसंघात शिवसैनिक संभ्रमात | पुढारी

कोकण : दापोली मतदारसंघात शिवसैनिक संभ्रमात

खेड, पुढारी वृत्तसेवा :  राज्याच्या राजकारणात सत्ताधारी शिवसेना पक्षात गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर पहिल्या दिवशी शिवसेनेसोबत असलेले खेड- दापोली- मंडणगड मतदारसंघाचे आमदार योगेश कदम हे बुधवारी गुवाहाटीकडे गेल्याच्या चर्चेने शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेना पदाधिकारी प्रसारमाध्यमांतून सावध प्रतिक्रिया व्यक्‍त करत असले, तरी स्थानिक आमदार योगेश कदम यांच्या निर्णयाचे समर्थन होताना दिसत आहे.

शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बंडाच्या झेंड्याचा थेट परिणाम झाला आहे. रायगडमधील सर्वच शिवसेना आमदार मंत्री शिंदे यांच्यासोबत गेल्याने रायगडची शिवसेनेची तटबंदी ढासळली आहे. खेड- दापोली- मंडणगड मतदारसंघ हा रायगडला लागून असल्याने व रायगड लोकसभा मतदारसंघात असल्याने या मतदारसंघात हे लोण पसरणार की काय, याबाबत मंगळवारी रात्रीपर्यंत शिवसैनिकांमध्ये साशंकता होती.

येथील आमदार योगेश कदम हे मंगळवारी मातोश्री व वर्षा बंगल्यावर असल्याने बंडाचे लोण रायगडच्या सीमेवर थोपवण्यात यश येणार, अशी चर्चा होती. परंतु, बुधवारी सकाळीच आ. योगेश कदम हे संजय राठोड यांच्यासह गुवाहाटीकडे रवाना झाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकल्यावर येथील शिवसैनिकांनी याची माहिती घेण्यास सुरुवात केली. आ. कदम यांच्याशी थेट संपर्क होत नसल्याने खेड, दापोली व मंडणगड तिन्ही तालुक्यात शिवसैनिक संभ्रमात पडले होते.

मागील काही महिन्यांपासून शिवसेनेतील काही नेते मंडळींकडून आ. कदम यांना डावलण्यात येत होते. अगदी मंडणगड व दापोलीस नगर पंचायतीच्या निवडणुकीतही याचा प्रत्यय आला होता. शिवसेना नेत्यांनीच राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत आ. कदम यांना एकाकी पाडले. पक्ष नेतृत्वानेही याकडे वेळीच लक्ष दिले नाही. पक्षांंतर्गत विरोधाचा सामनाही त्यांना वेळोवेळी करावा लागला.

अगदी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यापासून या मतदारसंघात त्यांना विरोधी पक्षासोबत शिवसेनेतील नाराज माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासोबत संघर्ष करत यश मिळवले. या पार्श्वभूमीवर ना. शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आ.कदम यांनी त्यांची भेट घेण्यासाठी जाणे यात नावीन्य असे काहीच नव्हते. पक्षांतर्गत विरोधी गटाकडून कोणतीच प्रतिक्रिया जरी आली नसली तरी समर्थक शिवसैनिक मात्र आ.क दम यांच्या भूमिकेचे समर्थन करताना दिसत आहेत.

आ. कदम यांनी पक्ष सोडला नसून ते सच्चे शिवसैनिक असल्यानेच आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहोत, अशी भूमिका खेड, दापोली व मंडणगड तालुक्यातील शिवसैनिक घेत आहेत. आगामी काही दिवसात राज्यातील राजकीय समिकरणाकडे मात्र या मतदारसंघातील सर्वच पक्षांचे व शिवसेनेच्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

Back to top button