

दक्षिण सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही सरकारी योजनेला हिंसक वळण देऊन आंदोलन करू नका. एखाद्या योजनेला आपला विरोध असेल, तर सनदशीर मार्गाचा अवलंब करा, असे आवाहन मंद्रुप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. नितीन थेटे यांनी केले.
मंद्रुप पोलिस ठाण्यात आयोजित युवक आणि पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेचे चालक यांच्या समुपदेशन बैठकीप्रसंगी ते बोलत होते. 'अग्निपथ' योजनेच्या पार्श्वभूमीवर देशभरात त्यास तरुणवर्ग विरोध करत आहे. हिंसक घटना घडत आहेत. 'अग्निपथ' योजनेस विरोध दर्शविण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातही निदर्शने करण्यात आली. दिवसेंदिवस या योजनेस विरोध करण्याची तीव्रता वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंद्रुप पोलिस ठाण्याच्या वतीने तरुणांसाठी समुपदेशन बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस पोलिस उपनिरीक्षक अमितकुमार करपे, अंगद गीते, अंकुश मोरे, सूर्यकांत बिराजदार, चंद्रकांत सुतार, अविनाश पाटील, किरण चव्हाण यांच्यासह मंद्रुप पोलिस ठाण्याच्या अखत्यारित असलेल्या गावांतील तरुण आणि सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थाचालक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी सपोनि डॉ. नितीन थेटे म्हणाले की, सैनिक किंवा पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे युवक किंवा भविष्यात शासकीय सेवेत दाखल होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणारे युवक अशा कोणत्याही आंदोलनात सहभात होताना आपल्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.