पुणे

किर्लोस्कर वसुंधरा नदी पुनरुज्जीवन’मार्फत सोमेश्वर मंदिर कुंड परिसरात रिड बेडचा प्रयोग

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पाषाण येथील सोमेश्वर मंदिरात भाविकांना तीर्थ म्हणून शुद्ध व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी राजमाता जिजाऊ कुंड परिसरात शंभर मीटरच्या रिड बेडचा प्रयोग राबविण्यात आला. किर्लोस्कर वसुंधरा राम नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या वतीने पर्यावरण तंत्रज्ञान वापरून करण्यात आलेल्या या प्रयोगामुळे भाविकांना पवित्र-शुद्ध तीर्थ उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अभियानाचे समन्वयक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.

ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या 900 वर्षे जुन्या सोमेश्वर मंदिर परिसरातील कुंडाचे काम 13 मार्च रोजी सुरू करण्यात आले. नदी पुनरुज्जीवनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये पाण्यात घालण्यापेक्षा कमी खर्चात अधिक पर्यावरणपूरक उपक्रम प्रत्यक्षात राबविले जाऊ शकतात. या प्रकारचे प्रयोग राज्यासह देशातील अनेक तीर्थक्षेत्रांवर करता येऊ शकतात.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केलेल्या पाण्याच्या तपासणीत डिझॉल्व्ह ऑक्सिजन लेव्हलमध्ये वाढ झाली आहे. याखेरीज पाण्याच्या पीएच लेव्हलमध्येही वाढ झाली असून, हे पाणी पिण्यायोग्य झाल्याचे चित्राव यांनी सांगितले. श्री सोमेश्वर ट्रस्टच्या सहकार्याने प्राणिशास्त्र तज्ज्ञ डॉ. संजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग पूर्ण करण्यात आला आहे.

अशी होईल प्रक्रिया

सोम म्हणजे चंद्र या संकल्पनेनुसार अर्धवर्तुळाकाराचा वापर करून आराखडा तयार करण्यात आला. पर्यावरणपूरक बंधारे बांधून त्याच्या तळाशी कोळसा, विटांचे तुकडे, बारीक वाळू व माती यांचा वापर करून स्थानिक जातीच्या वनस्पती लावण्यासाठी जमीन तयार करण्यात आली. कुंडाच्या शेजारून वाहणार्‍या प्रदूषित राम नदीपात्रातील पाणी या रिड बेडमध्ये आल्यावर झाडांची मुळे त्यावर प्रक्रिया करून घातक अशी मूलद्रव्ये शोषून घेतील.

बांध ओलांडून पुढे जाताना हे पाणी गाळले व पाझरले जाऊन त्यावर जैविक प्रक्रिया होईल. अधिक शुद्धपाणी शेवटच्या कमख तळ्यात जाईल. तेथे पाण्यातील हायड्रोजनचा समतोल साधला जाईल. नंतर हे सारे शुद्ध झालेले पाणी कुंडात प्रवेश करतानादेखील गाळले जावे, या उद्देशाने तेथे जाळीचा दरवाजा बसविण्यात आला आहे. त्याद्वारे नागरिकांना येथे पवित्र-शुद्ध तीर्थ उपलब्ध होईल.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT