पुणे : पुढारी वृत्तसेवा
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण ऑनलाईन घेण्याचा घाट राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाने घातला खरा, परंतु तांत्रिक कारणांमुळे हे ऑनलाईन प्रशिक्षणच बंद पडले आहे. ऑफलाईन प्रशिक्षण कार्यक्रम घेणे सहज शक्य असतानाही ऑनलाईन प्रशिक्षणाच्या नादी लागलेले विद्या प्राधिकरण प्रशासन तोंडावर पडल्याचे चित्र प्रत्यक्षात दिसून आले आहे.
ज्या शिक्षकांनी 12 आणि 24 वर्षांचा सेवाकाळ पूर्ण केला आहे. अशा शिक्षकांसाठी विद्या प्राधिकरणामार्फत वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून शिक्षकांचे वेतन वाढते. त्याचबरोबर जबाबदारीदेखील वाढत असते. यंदा नवीन शैक्षणिक धोरण राबवायचे आहे. त्यासाठीचे प्रशिक्षण शिक्षकांना ऑफलाईन देणे गरजेचे होते.
मात्र, तब्बल 94 हजार कर्मचार्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हे प्रशिक्षण तीन दिवस तांत्रिक कारणांमुळे बंद पडले आहे. यासंदर्भात विद्या प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, विद्या प्राधिकरण व इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्या समन्वयाने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण कोर्सचे विकसन करण्यात येऊन हा कोर्स इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गुरुवारी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर क्लाउड सेवांचे अद्ययावतीकरण करत असताना प्रणाली वापरण्यात वापरकत्र्यांना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आकस्मिक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण जगभरातील वापरकर्त्यांंसाठी ही प्रणाली पुढील दोन ते तीन दिवस बंद ठेवून अधिक अद्ययावत स्वरूपात ती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी यांना हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी वाढवून दिला जाईल आणि इन्फोसिस स्प्रिंगबोर्डची सेवा नव्याने सुरू झाल्यावर ईमेलद्वारे कळविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा