पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सुरु असलेला चोरट्यांचा कहर काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. 7 जून ला एकाच दिवशी तब्बल अठरा ठिकाणी चोर्या झाल्याची नोंद आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या चिखली, देहूरोड, हिंजवडी, चाकण या परिसरात घरफोडीचे चार प्रकार समोर आले आहेत.
चिखली येथील गुन्ह्यात वडाचा मळा येथील दोन दुकानातून 21 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरून नेली. देहूगावातील बोत्रे कॉम्प्लेक्समधील कपड्यांच्या तीन दुकानातून 29 हजार 950 रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. हिंजवडी येथील घटनेत एका घरातून सात लाख पाच हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. चाकण येथील घटनेत 74 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.
मोरेवस्ती परिसरातून चोरट्यांनी एक मोबाईल आणि लॅपटॉप चोरून नेला. निगडी, चिंचवड, आळंदी, हिंजवडीमधून 11 मोबाईल चोरीला गेले आहेत. तर, ट्रान्सपोर्ट नगर निगडी येथे चालकाचे पाच हजार रुपये चोरून नेले आहेत. दिघी, एमआयडीसी भोसरी, भोसरी, हिंजवडीमधून प्रत्येकी एक, चाकणमधून तीन अशी सात दुचाकी वाहने चोरीला गेली आहे. तर, पिंपळे सौदागरमधून कारचा 10 हजारांचा सायलेन्सर चोरून नेला आहे.
हेही वाचा