

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
पतीने गळफास घेतल्यानंतर मी स्वतः एकट्याने त्याला खाली उतरवले. त्यावेळी माझा तोल गेला अन आम्ही दोघेही खाली पडलो. त्यामुळे पतीच्या डोक्याला दुखापत झाली, असा कबुलीजबाब देत पत्नीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यातील विशेष बाब म्हणजे शवविच्छेदन अहवालानंतर डॉक्टरांनी देखील पोलिसांना पतीने गळफास घेतला असल्याचे सांगितले.
मात्र, तरी देखील पोलिसांना संशय येत असल्याने खोलवर चौकशी करीत मृताचे दुसर्यांदा शवविच्छेदन करून घेतले. त्यावेळी पत्नीनेच खून करून आत्महत्येचा बनाव केल्याचे समोर आले. अनिल उत्तमराव राठोड (वय 35) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिल यांचे भाऊ रविकुमार उत्तमराव राठोड (32, रा. परभणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. 7) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनिल यांची पत्नी उषा अनिल राठोड हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राठोड कुटुंबीय मूळचे परभणी येथील आहेत. राठोड दांपत्याला तीन मुले आहेत. यापूर्वी ते ऊस तोडीचे काम करीत होते. मात्र, पुण्यात गेल्यानंतर हाताला काहीतरी चांगले काम मिळेल, या आशेने दोघेही नुकतेच 1 जून 2022 रोजी ताथवडे येथील लोंढे वस्तीत येथे राहण्यास आले होते. दरम्यान, सोमवारी (दि. 6) रात्री दोनच्या सुमारास त्यांच्यात घरगुती कारणावरून भांडण झाले. त्यावेळी आरोपी उषा हिने अनिल यांच्या डोक्यात मारहाण करून त्यांचा खून केला.
त्यानंतर पोलिसांना वेगळीच स्टोरी सांगून आत्महत्येचा बनाव केला. पोलिसांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मात्र, तरीही त्यांनी शवविच्छेदन अहवाल येण्याची वाट पहिली. शवविच्छेदन झाल्यानंतर औंध येथील डॉक्टरांनी गळफास घेऊन मृत्यू झाल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यामुळे पोलिसही चक्रावले. मात्र, आरोपी पत्नीच्या रडण्यात, बोलण्यात नाटकीपणा जाणवत असल्याने पोलिसांनी इतरत्र चौकशी केली.
त्यावेळी त्यांच्यात कायम वाद होत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीवर प्रश्नांची सरबत्ती केली. पोलिसांच्या प्रश्नांपुढे तिचा टिकाव लागला नाही. आरोपी पत्नीने खुनाची कबुली देत हकीकत सांगितली. आरोपीने कारण घरगुती सांगितले आहे. मात्र, वेगळेच कारण असल्याची शंका पोलिसांना आहे.