पुणे ; पुढारी वृत्तसेवा : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला ॲथेलेटिक्स प्रकारात पाहिले सुवर्ण पदक मिळवून देण्याचा मान पुण्यातील दक्षिण कमांड सुभेदार नीरज चोप्राने मिळवून देत इतिहास रचला. नीरजला सुवर्ण पदक मिळताच दक्षिण कमांडमध्ये एकच जल्लोष झाला. नीरज चोप्रा भालाफेकचे पुण्यात प्रशिक्षण घेत होता. आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट मध्ये कठोर परिश्रम करत मोठे यश संपादन केले.
दक्षिणी कमांडचे सुभेदार नीरज चोप्रा यांनी ८७.५८ मीटर लांब भाला फेकून ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फील्ड गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनून इतिहास रचला.
नीरज चोप्राने पुणे येथील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथे प्रशिक्षण घेतले. तो मूळचा हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील शेतकरी कुटुंबातील आहे.
२६ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांना भारतीय लष्करात नायब सुभेदार पदावर कनिष्ठ कमिशन अधिकारी म्हणून नावनोंदणी करण्यात आली.
नीरजला गुणवत्तेच्या सेवेसाठी २०१८ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २०२१ मध्ये विशिष्ठ सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.
पुणे स्थित दक्षिण कमांड चे प्रमुख लेफ्टनंट जनरल जेएस नैन यांनी नीरज चोप्रा यांचे ऐतिहासिक कामगिरीबद्दल आणि भारतीय लष्कर आणि संपूर्ण राष्ट्राला अभिमानास्पद केल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे
नीरज चोप्रा यांचे पूर्वजही महाराष्ट्रातील आहेत. रोड मराठ्यांच्या नावांचा अपभ्रंश होऊन उत्तर भारतातील आडनावांशी साधर्म्य ठेवणारे आहे. मात्र, नीरज यांचे वडील रोड मराठा असल्याचे सांगतात.
तसेच त्याने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपण रोड मराठा आहोत आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे असे सांगितले होते.
काही शतकांपूर्वी पानिपतच्या लढाईत त्यांच्या पूर्वजांनी तलवार हातात घेऊन पानिपतावर कर्तबगारी गाजवली.
आज त्याच मातीत नीरजने भाला हातात घेऊन भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली.