लस बाबतचा संभ्रम आणि वास्तव | पुढारी

लस बाबतचा संभ्रम आणि वास्तव

डॉ. नानासाहेब थोरात, ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन

देशातील काही भागांत कोरोना संक्रमितांचे आकडे नव्याने वाढू लागलेले असतानाच एक महत्त्वाचा प्रश्न सर्वदूर चर्चिला जात आहे. तो म्हणजे कोव्हिड प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेऊनही कोरोनाची लागण का होत आहे? हा प्रकार केवळ भारतातच नव्हे तर जगभरात दिसून येत आहे. त्यामुळे लस बाबत संभ्रमाची, संशयाची स्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना कोव्हिड होण्याचे प्रमाण हे आजघडीला अत्यंत कमी असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अतिशय नगण्य आहे.

सध्या भारतामध्ये कोरोना व्हायरसवरील लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची संख्या वेगाने वाढते आहे. त्याचबरोबर देशातील अनेक भागांतून अशाही बातम्या येत आहेत की, लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोव्हिड होतो आहे. यामुळे अर्थातच संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. लसीचे दोन्ही डोस घेऊनसुद्धा कोव्हिड होत असेल तर मग लस घ्यायचीच कशाला, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्रश्नात थोडेफार तथ्य आहे आणि लोकांचा लसीबद्दलचा गैरसमजही आहे. दुर्दैवाने मागील वेळेसारखीच लोकांमध्ये लस न घेण्याची मानसिकता तयार होत असून ती चिंता वाढवणारी आहे. या पार्श्वभूमीवर नक्की दोन्ही डोस घेऊनसुद्धा कोव्हिड का होतोय, याच्या खोलात जाऊन पाहण्याची गरज आहे.

आजच्या जागतिक परिस्थितीचा विचार केला तर असे दिसून येत आहे की, बहुतेक प्रकरणांमध्ये, ज्यांना लसीकरण केले गेले आणि कोव्हिडचा संसर्ग झाला अशा रुग्णांना, कोव्हिडची गंभीर लक्षणे निर्माण झाली नाहीत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागली नाही.

सध्या केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये एक किंवा दोन्ही डोस घेतलेल्या काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागत आहे. हे सर्व कशामुळे होतेय हा प्रश्न नक्की सर्वांना कोड्यात टाकतोय. यामागची काही कारणे समजून घेऊयात. पहिले म्हणजे लसींची परिणामकारकता. जेव्हा जगातील विविध लसी लसीकरणासाठी प्रमाणित केल्या गेल्या तेव्हा सर्वच कंपन्यांनी त्यांची परिणामकारकता जाहीर केली होती.

भारतामध्ये सध्या वितरित असलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठ संशोधित कोव्हिशिल्डच्या दोन्ही डोसनंतरची परिणामकारकता ही सुमारे 65 ते 70 टक्क्यांच्या आसपास आहे; तर रशियन स्पुटनिक-व्हीची परिणामकारकता ही 90 टक्क्यांच्या आसपास आहे. तिसर्‍या कोव्हॅक्सिन लसीची नक्की परिणामकारकता अजून समजली नाही. याचाच अर्थ असा होतो की 100 लोकांनी जर कोव्हिशिल्ड लस घेतली तर 70 लोकांना कोव्हिड होणार नाही. तेच प्रमाण स्पुटनिक-व्हीसाठी 90 असेल.

म्हणजेच कोव्हिशिल्ड लस घेतली तर 30 लोकांना कोव्हिड आणि स्पुटनिक-व्ही लस घेतली तर 10 लोकांना कोव्हिड होण्याची शक्यता आहे. मात्र, लस घेऊनसुद्धा जरी या लोकांना कोव्हिड झाला तरी त्यांना वर सांगितल्याप्रमाणे कोव्हिडची गंभीर लक्षणे निर्माण होणार नाहीत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागणार नाही.

दुसरे यामागचे कारण म्हणजे कोरोना व्हायरसचे येणारे नवनवीन स्ट्रेन्स. आतापर्यंत मूळ व्हायरसचे पाचपेक्षा अधिक स्ट्रेन्स जगभरात कोव्हिडचा हाहाकार घालताना दिसून आले आहेत. आता दिल्या जाणार्‍या सर्वच लसी या मार्च-एप्रिल 2020 मध्ये विकसित करण्यात आलेल्या आहेत आणि या सर्वच लसी कोरोनाच्या मूळ स्ट्रेन्सवर प्रभावी ठरतील अशा प्रकारे विकसित केल्या आहेत. दुर्दैवाने कोरोनाचे नवीन स्ट्रेन्स अतिशय वेगाने निर्माण झाले.

याचबरोबर काही नवीन व्हेरियंटस् आता लसीमुळे तयार होणार्‍या अँटिबॉडीजपासून स्वतःला वाचवू शकत आहेत किंवा लसीमुळे तयार झालेल्या प्रतिकारशक्तीला फसवत आहेत, असेही काही अहवाल समोर आले आहेत. काही लोकांना दोन्ही डोस घेऊनसुद्धा पुन्हा कोव्हिड होतो आहे. यामागे नवीन तयार झालेले स्ट्रेन्स किंवा व्हेरियंटस्सुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत का याचा मात्र अभ्यास अजून समोर आला नाही.

याचबरोबर व्हायरसच्या बदललेल्या प्रकाराविरुद्ध नवी लस तयार करावी लागेल, असाही एक मतप्रवाह आहे. सध्या तरी सर्वच कंपन्या या शक्यता फेटाळून लावत आहेत. त्याचबरोबर वयोवृद्ध लोकांना लसीचा तिसरा डोस द्यावा का, याच्याही शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत किंवा दोन वेगवेगळ्या कंपनींच्या लसी देऊन यावर उपाय शोधता येईल याबाबतही संशोधनपर चाचपणी सुरू आहे.

जागतिक परिस्थिती काय सांगते?

लसीचे दोन्ही डोस घेऊनसुद्धा कोव्हिड होण्याचा प्रकार फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात दिसून येत आहे. इंग्लंडमधील इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडनच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार दोन्ही डोस घेतल्यावर कोव्हिड होण्याचे प्रमाण 0.2 टक्के एवढे आहे.

म्हणजेच दोन्ही डोस घेतलेल्या 1000 लोकांपैकी फक्त 20 लोकांना पुन्हा कोव्हिड होतोय; तर 1000 लोकांपैकी फक्त एका व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत आहे. असाच एक अहवाल ऑस्ट्रेलिया देशातून आला आहे त्यामध्ये असे दिसून आले आहे की, जर 80 वर्षांवरील व्यक्तीने लसीचा एकही डोस घेतला नाही आणि त्याला कोव्हिड झाला तर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची शक्यता 99 टक्के आहे, तर त्यांच्या मृत्यूचे प्रमाण 32 टक्के एवढे आहे.

70 वर्षांखालील व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाण 14 टक्के, 60 वर्षांखालील व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण 3 टक्के आणि 50 वर्षांखालील व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाण फक्त 1 टक्के एवढेच आहे. याउलट जर 80 वर्षांवरील व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे 1 टक्क्यापेक्षा कमी आहे आणि तरुण लोकांच्यात तर हे शून्यच आहे.

जगभरात अजून एक सर्वसामान्य स्थिती दिसून आली आहे ती म्हणजे लस ही काही 100 टक्के कोव्हिड रोखणारा उपाय नसून त्याच्याबरोबर इतर उपायही करावे लागत आहेत. मुळातच लस ही एखाद्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीला व्हायरसविरुद्ध अँटिबॉडीज (प्रतिपिंड) तयार करण्यासाठी उत्तेजित करतात. या अँटिबॉडीज लसीसाठी विषाणू किंवा रोगजनकांच्या विरुद्ध असतात आणि शरीराला संसर्ग होण्याआधीच लढा देण्यास आणि गंभीर रोग रोखण्यास कारणीभूत ठरतात.

तथापि, काही लोकांमध्ये लसीला पुरेशी प्रतिकारशक्ती नसेल आणि व्हायरसच्या संपर्कात आल्यास अजूनही कोव्हिडची लागण होण्याची शक्यता दिसून येते आहे. एखादी व्यक्ती लसीला कसा प्रतिसाद देते यावर अनेक वेगवेगळ्या घटकांचा परिणाम होतो. यामध्ये त्या व्यक्तीचे वय, लिंग, औषधे, आहार, व्यायाम, आरोग्य आणि तणाव पातळी यांचा समावेश आहे.

भारतामधील शास्त्रीय अभ्यासातून तयार झालेली माहिती अजून समोर आली नसली तरी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना कोव्हिड होण्याचे प्रमाण कमी असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अतिशय नगण्य आहे, त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.

मुलांच्या लसीकरणाचे काय?

सध्या अजून एका प्रश्नाची सर्वत्र चर्चा असून त्याचे उत्तर सापडणे अवघड झाले आहे. हा प्रश्न म्हणजे लहान मुलांच्या लसीकरणाचे करायचे काय? ते कधी सुरू होणार? झाले तर कोणत्या वयोगटाला आधी मिळणार आणि ते नक्की किती दिवस चालणार? मुलांसाठी वेगळी लस तयार करावी लागणार काय?

सध्या मोठ्या व्यक्तींना ज्या लस दिल्या जात आहेत त्याच लसींच्या क्लिनिकल ट्रायल्स 6 ते 12 या वयोगटातील मुलांवर चालू आहेत; मात्र नक्की कधीपर्यंत त्याची माहिती जाहीर केली जाईल, हे मात्र सांगता येत नाही. तसेच लहान मुलांसाठी नवीन लस विकसित करावी लागणार नाही. आहे त्याच लसी कमी-अधिक प्रमाणात मात्रा देऊन उपयोगी ठरतील.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांची प्रतिकारशक्ती अतिशय वेगाने विकसित होत असते. नैसर्गिक वातावरणात वाढणार्‍या मुलाला जन्मापासून त्याच्या वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत 4000 प्रकारच्या वेगवेगळ्या जीवजंतूंचा आक्रमणाला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती ही तुलनेने मोठ्या व्यक्तींपेक्षा फारच मजबूत असते. त्यामुळेच संपूर्ण जगात लहान मुलांना कोव्हिड होण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे.

संपूर्ण इंग्लंडमध्ये फक्त एका लहान मुलाचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला आहे आणि संपूर्ण युकेमधील सर्व शाळा गेले वर्षभर नियमितपणे सुरू आहेत. त्यामुळे लहान मुलांना अतिशय कमी वेळेत कोव्हिडची लस देण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे. जगात फक्त कॅनडामध्ये फायजर या कंपनीची लस लहान मुलांना दिली जात आहे. मात्र, या कंपनीने अशा प्रकारच्या क्लिनिकल ट्रायल्स केलेल्या नसून त्यांच्या या ट्रायल्स चालू आहेत आणि त्याची परिणामकारकता आणि मुलांवर होणारे इतर परिणाम याची माहिती अजून जाहीर केली नाही.

मात्र, कॅनडा सरकारने मुलांना लस देण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला असून त्याची मात्रा मोठ्या व्यक्तींना दिल्या जाणार्‍या डोसइतकीच आहे. भारतात सुद्धा अशा प्रकारच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. मात्र, कोणत्याही क्लिनिकल ट्रायल्स न घेता किंवा त्यांचे परिणाम जाहीर न करता लहान मुलांचे लसीकरण सुरू करण्याने आणखीनच गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. जगभरातील परिस्थितीचा विचार केला असता असे दिसून येते की लहान मुलांच्या लसीकरणाची गरज भासणार नाही.

Back to top button