पुणे

आता चव चाखा गावरान, केशरची; हंगाम बहरल्याने बाजारातील आवक वाढली

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: नैसर्गिकरीत्या पिकविलेले, रसाळ आणि चवीने गोड असलेल्या गावरान, पायरी आणि केशर आंब्यांचा हंगाम बहरल्याने मार्केट यार्डातील फळबाजारात या आंब्यांची आवक वाढली आहे. रविवारी (दि. 12) फळबाजारात तब्बल साडेचार ते पाच हजार क्रेट आंब्यांची आवक झाली. या आंब्यांच्या खरेदीसाठी घरगुती ग्राहकांसह हातगाडीवाले व स्टॉलधारकांनी मोठी गर्दी केली होती.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात मावळ, मुळशी, बारामती, भोर, इंदापूर या तालुक्यांतून गावरान आंबे दाखल होऊ लागले आहेत. कच्च्या आंब्यांबरोबर तयार आंब्यांचाही यामध्ये समावेश आहे. 'रविवारी घाऊक बाजारात तयार गावरान आंब्याला डझनास 200 ते 500 रुपये भाव मिळाला.

पायरी, गोटी आंब्याला डझनास अनुक्रमे 200 रुपये आणि 30 ते 100 रुपये भाव मिळाला. कच्च्या केशरला किलोस 30 ते 70 रुपये भाव मिळत आहे. जूनपासून सुरू झालेला हंगाम पुढील 15 ते 20 दिवस सुरू राहील, अशी माहिती आंबा व्यापार्‍यांकडून देण्यात आली.

गावरान आंबा 151 रुपये किलो

मार्केट यार्डातील तुळजाराम पंथराम बनवारी यांच्या गाळ्यावर रविवारी 200 ते 300 क्रेट आंबा दाखल झाला. पुणे जिल्ह्यातून ही आवक झाली. या वेळी आंब्याच्या किलोला उच्चांकी 151 रुपये भाव मिळाला. रत्नागिरी व कर्नाटकातील आंबा संपल्यानंतर गावरान आंब्यांची बाजारात आवक होते. 'यंदा परराज्यांतील आंब्यांची आवक रोडावल्याने स्थानिक आंब्याला चांगला दर मिळत आहे. याखेरीज फळांचा दर्जाही चांगला आहे,' अशी माहिती आंब्याचे व्यापारी युवराज काची यांनी दिली.

हंगाम बहरात असल्याने बाजारात गावरान आंब्यांची आवक वाढली आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात आंब्याच्या लागवडी वाढल्याने यंदा आवकही जास्त आहे. त्याला मागणीही चांगली असल्याने एरवीच्या तुलनेत आंब्याला जास्त दर मिळत आहे.

                                  – यशवंत कोंडे, व्यापारी, मार्केट यार्ड

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT