पुणे : पुढारी वृत्तसेवा
बदल्या झालेल्या अधिकार्यांना आषाढी सोहळा होईपर्यंत कार्यमुक्त करू नये. याशिवाय सोहळ्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचार्याला या कालावधीमध्ये सुटी देऊ नका, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पालखी मार्गावरील शासकीय जागेची सुविधेच्या दृष्टेने माहिती घेऊन अशा जागा पालखी सोहळ्यासाठी कायमस्वरुपी आरक्षित करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे आदेशही त्यांनी दिले.
पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या रविवारच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते. बैठकीत आषाढी वारीबाबत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अॅपचे उद्घाटन करण्यात आले.
आळंदीमध्ये भामा-आसखेड येथून पाणी देण्यास सुरुवात झाली. मात्र, पाणी दिवसाआड देण्यात येत असल्याची तक्रार एका वारकर्याने उपमुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर पवार यांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. अधिकार्यांनी आणखी निधीची गरज असल्याचे सांगितले.
त्यावर नगरपरिषदेच्या अधिकार्यांना फैलावर घेत, "या वेळी निधी देतोय, पण तुम्ही तुमचा निधी उभा करा, मला प्रत्येकवेळी निधी देता येणार नाही, तुम्हाला पाणी उपलब्ध करून दिले आहे, व्यवस्थित नियोजन करून पाणीपट्टी गोळा करा. मला काहीच कारणे सांगू नका. आळंदीला दररोज पाणी द्या," असे पवार म्हणाले.
हेही वाचा