सातारा : डोंगराखाली गडप होण्याची टांगती तलवार कायमच | पुढारी

सातारा : डोंगराखाली गडप होण्याची टांगती तलवार कायमच

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यात वर्षानुवर्षे डोंगराच्या पहाडी कातळाखाली विसावलेली अन् निर्ढावलेली अनेक गावं जीव मुठीत धरून आजही जगत आहेत. भूस्खलन होण्याचा धोका असलेल्या या गावांची कहाणी थरकाप उडवणारी असून, गतवर्षी जुलैमधील अतिवृष्टीत त्याची नव्याने प्रचिती आली होती. आता थरकाप उडवणार्‍या जुन्या आठवणींना कवटाळून यंदाच्या पावसाळ्याला सामोरे जावे लागत आहे. चिलटासारखं पिढ्यान्पिढ्या जीवन जगणार्‍या या गावांना डोक्यावरील डोंगराचा पहाड हेच सुरक्षेचं कवच बनले आहे. या गावांच्या पुनर्वसनासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी त्याला अपेक्षित गती मिळालेली नाही. सातारा जिल्ह्याच्या डोंगरकपारीत पावलापावलांवर ‘माळीण’ सारखी गावे आढळत असल्याचेच भयावह वास्तव आहे.

भिलारमध्ये पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली होती घरे

महाबळेश्वर तालुका हा अतिदुर्गंम, डोंगराळी आणि अतिपावसाळी भाग असल्याने येथील जनतेला जीव मुठीत घेऊनच राहावे लागते. मुसळधार पावसामुळे जमीन खचणे, घरांच्या भिंती पडणे, घरांच्या भिंतींना तडे जावून दुभंगणे, वृक्ष पडणे असे प्रकार सातत्याने घडत असतात. तालुक्यातील येरणे बु॥, येरणे खुर्द, आचली, मजरेवाडी, देवसरे, एरंडल, मालुसर, दरे अशी अनेक गावे माळीणसारखी दुर्घटना घडते की काय? अशा भीतीच्या छायेत पावसाळा काढत असतात. दि. 1 जुलै 2005 साली तुफान अतिवृष्टी होवून भिलार येथील नारळी बाग परिसरात जमीन खचली होती. त्यावेळी जमीन खचली अन् परिसरातील जमिनींना भेगा पडून 38 कुटुंबीयांची घरे पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. या थरारक घटनेने एकच हाहाकार उडाला होता. हे आठवलं की आजही येथील ग्रामस्थांचा थरकाप उडतो.

वाईच्या जोर, जांभळी खोर्‍यात पाऊस सुरू झाला की उडतो थरकाप

वाई तालुक्याच्या पश्चिमेकडे असणार्‍या जोर, जांभळी खोर्‍यातील जनजीवन पावसाळ्यात थरकाप उडवणारे असते. पाऊस सुरू झाला की या डोंगर कपारीतील गाव न् गाव घाबरून असते. गोळेवाडी, गोळेगाव, जांभळी, धनगरवाडी, घेराकेंजळ, कोंढावळे, कोंडोली, जोर, उळुंब, वयगाव, बोरगाव खुर्द, चिखली (वाडकरवाडी), ओहळी, रायरेश्वर, आकोशी या गावांना तर कधी तर भूस्खलन होईल हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे.

सातार्‍याच्या डोंगरदर्‍यात भीतीचीच छाया

सातारा तालुक्यातील धोकादायक बनलेल्या काही गावांना प्रशासनाकडून दरवर्षी नोटिसा देण्यात येतात. मात्र, संबंधित गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या मागणीवर ठोस उपाययोजना अद्यापही झालेली नाही. 2005 मध्ये चेवलेवाडी गावात डोंगर खचल्याने सातारा तालुक्यातील कासाणी व कास रस्त्याच्या खाली वसलेल्या अनेक गावांमधून दगडधोंडे येऊन ढासळण्याचे प्रकार होत असतात. त्याचबरोबर सांडवली, काळोशी, पांघारे, पवारवाडी, पवनगाव, तळ ठोसेघर, चिखली, जांभे, भांबे, धावली, चोरगेवाडी अशी अनेक गावे संपूर्ण पावसाळाभर भीतीच्या छायेत असतात.

डबर, मातीचे उत्खनन दरडी कोसळण्यास जबाबदार

जिल्ह्यात बेकायदेशीर डोंगर पोखरून हजारो ब्रास डबर माती मुरुमाचे उत्खनन केले जाते. यासाठी स्पोटके, सुरुंग लावले जातात. त्याचाही परिणाम डोंगर कमकुवत होण्यास कारणीभूत होत आहे. रस्ते बनविण्यासाठी स्पोटके वापरली जातात. जिल्ह्यात मानवी वस्तीपासून अगदी अभयारण्यापर्यंत डोंगर कुरतडण्याचे प्रमाण वाढल्याने सातारा जिल्ह्यातही माळीण गावासारखा प्रकार झाल्यास त्यात नवल वाटायला नको.

गायब झालेली माय-लेकरं आजही सापडलेली नाहीत

गतवर्षी पाटण व वाई तालुक्यात अतिवृष्टीने भयावह स्थिती ओढवली होती. विशेषत: पाटण तालुक्यात मृत्यूने अक्षरश: थैमान घातले होते. वाईच्या गोळेवाडीवर डोंगर कोसळून गायब झालेली माय-लेकरं आजतागायत सापडलेली नाहीत. त्यावेळच्या आठवणींनी आजही या गावांमध्ये गलबला होत आहे. महाबळेश्वर, जावली, सातारा या तालुक्यांमध्येही अनेक गावे डोंगराच्या आडोशाला वास्तव्यास आहेत. काही गावांची शासन दरबारी नोंद आहे, तर अनेक गावांनी आपत्ती ओलांडली नसल्याने त्यांची रेड अलर्टमध्ये नोंदच नाही. पाऊस सुरू झाला की अनेक गावांच्या छाताडावर रोजच दगडधोंडे आपटत असून, त्याचा आवाज आला की येथील भोळ्याभाबड्या जनतेच्या काळजाच्या जणू ठिकर्‍याच उडतात. दरड कोसळण्याच्या ज्या घटना घडल्या. त्यामध्ये मुख्य कारण म्हणजे जंगलतोड शिवाय मोठ्या प्रमाणात डोंगर फोडण्यासाठी दगड उत्खननासाठी लावण्यात येणारे सुरुंग, उन्हाळ्यात डोंगर रांगांना वणवे लावले जातात. यातून वृक्षतोडही केली जाते व त्यातूनच दरड कोसळण्याचे प्रमाण वाढते. वाई, पाटण, सातारा, जावली, महाबळेश्वर या तालुक्यातील अशी अनेक गावे भीतीच्या छायेखाली दिवस ढकलत आहेत.

पाटण तालुक्यातील 7 गावे मृत्यूच्या जबड्यात; 61 गावांना भूस्खलनाचा धोका

भूकंप, अतिवृष्टी, महापुरानंतर गतवर्षी पासून भूस्खलनामुळे पाटण तालुक्यातील अनेक गावं अक्षरशः खिळखिळी झाली आहेत. तालुक्यातील सात गावांसह 558 कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. त्याचवेळी आणखी 61 गावांवर भूस्खलन, दरड कोसळणे व 41 गावांत अतिवृष्टी, दरड, कडा कोसळून संबंधित गावं उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. तालुक्यातील कायमस्वरूपी पुनर्वसन करायच्या सात गावांमध्ये खालचे व वरचे आंबेघर तर्फ मरळी, ढोकावळे, मिरगाव, काटेवाडी (हुंबरळी), जीतकरवाडी, शिद्रुकवाडीच्या एकूण 558 कुटुंबांचा समावेश आहे. त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी 7.26 हेक्टर जमिनीचे क्षेत्र लागणार असून, भूसंपादन कायद्यानुसार त्याची किंमत 3.08 कोटी रुपये तर खासगी वाटाघाटी नुसार 3.86 कोटी रुपये इतकी अंदाजे रक्कम सुचविण्यात आली आहे. याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तालुक्यातील आपत्तीग्रस्त गावांसाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. दरवर्षी ऐन पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगत असणार्‍या स्थानिक हजारो ग्रामस्थांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी यापुढे खर्‍या अर्थाने सकारात्मक प्रयत्नांची गरज आहे.

जावलीत महाकाय कातळाखाली अनेक घरे तग धरून

जावली तालुक्यात भूस्लखन होण्यासारखी परिस्थिती डोंगरकपारीतील अनेक गावांमध्ये आजही कायम आहे. बोंडारवाडी, बावळे,भुतेघर, वाटांबे, रेंगडी, कुंभारगणी अशी अनेक गावे पावसाळ्यात जीव मुठीत धरून वास्तव्यास आहेत. क्षेत्र मेरूलिंग हे प्रसिद्ध शिवलिंग व पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येत आहे. मेरूलिंगची वस्ती उंच डोंगरावर वसली असली तरी या नावाच्या महाकाय पठाराखालील बाजूला मेरूलिंगची अनेक घरे तग धरून आहेत. यासह पायथ्याच्या जावळेवाडीलाही दरडी कोसळण्याचा धोका आहेच.

 

Back to top button